advertisement

आईची भीती, लेकीचं भविष्य अन् पोलिसांची वेळीच धाव, 17 वर्षांच्या मुलीसोबत घडणार होतं भयंकर

Last Updated:

या सगळ्या भावनिक घालमेलीतून तिने अवघ्या 17 वर्षांच्या, दहावीत शिकणाऱ्या लेकीचं लग्न लावण्याचा निर्णय घेतला. मात्र, पोलिसांच्या वेळीच केलेल्या हस्तक्षेपामुळे एका अल्पवयीन मुलीचं आयुष्य अंधाराकडे जाण्यापासून वाचलं.

News18
News18
छत्रपती संभाजीनगर : “मी दिवसभर परक्यांच्या घरची भांडी घासते… पण माझ्या मुलीचं आयुष्य सुरक्षित राहील का, याचीच जास्त चिंता आहे,” असे म्हणत एका आईने आपल्या मनात साचलेली भीती व्यक्त केली. आर्थिक अडचणी, महानगरातील असुरक्षित वातावरण आणि घरात पुरुष आधार नसल्याची खंत… या सगळ्या भावनिक घालमेलीतून तिने अवघ्या 17 वर्षांच्या, दहावीत शिकणाऱ्या लेकीचं लग्न लावण्याचा निर्णय घेतला. मात्र, पोलिसांच्या वेळीच केलेल्या हस्तक्षेपामुळे एका अल्पवयीन मुलीचं आयुष्य अंधाराकडे जाण्यापासून वाचलं.
बीड बायपास रोडवरील शुभम लॉन्स येथे गुरुवारी (12 फेब्रुवारी) लग्नाची जोरदार तयारी सुरू होती. मंडप सजलेला, पाहुण्यांची लगबग, आणि नवरी मुलगीही साजशृंगार करून तयार… वातावरणात लग्नसोहळ्याचा उत्साह होता. मात्र, याच वेळी महिला आणि  बालविकास समितीच्या सदस्य आम्रपाली बोर्डे यांना या विवाहाबाबत संशयास्पद माहिती मिळाली. त्यांनी तातडीने दामिनी पथकातील पोलीस उपनिरीक्षक कांचन मिरधे यांच्याशी संपर्क साधला.
advertisement
पोलिस पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि कागदपत्रांची पडताळणी केली असता मुलगी अल्पवयीन असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे लग्नसोहळा थांबवण्यात आला. मंडपात सुरू असलेली लगबग क्षणात शांत झाली आणि एक मोठा अनर्थ टळला.
मुलीच्या आईने आपली व्यथा मांडताना सांगितले की, त्या मुंबईत धुणी-भांडी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. कामानिमित्त दिवसभर घराबाहेर राहावे लागते. घरात पुरुष व्यक्ती नसल्याने आणि मुलगी एकटी राहिल्याने तिच्या सुरक्षिततेबाबत त्या सतत चिंतेत असत. “वाईट नजरा, चुकीचं वातावरण… मला भीती वाटते,” असे सांगताना त्या आईचा आवाज दाटून आला होता. या भीतीपोटीच त्यांनी संभाजीनगरमधील 22 वर्षीय रिक्षाचालकाशी मुलीचे लग्न ठरवले होते.
advertisement
लग्नासाठी आहेर, भांडीकुंडी, सगळी तयारी पूर्ण झाली होती. मात्र, कायद्याची जागरूकता आणि सामाजिक जबाबदारी यामुळे हा बालविवाह रोखण्यात यश आले. पोलिसांनी पालकांना समुपदेशन करून अल्पवयीन मुलीच्या शिक्षणाचे आणि भविष्याचे महत्त्व पटवून दिले.
आईची भीती खरी होती, पण उपाय चुकीचा होता आणि म्हणूनच वेळीच घेतलेल्या या निर्णयामुळे एका मुलीला तिचं शिक्षण, स्वप्नं आणि स्वतःचं आयुष्य घडवण्याची आणखी एक संधी मिळाली आहे.
view comments
मराठी बातम्या/छ. संभाजीनगर/
आईची भीती, लेकीचं भविष्य अन् पोलिसांची वेळीच धाव, 17 वर्षांच्या मुलीसोबत घडणार होतं भयंकर
Next Article
advertisement
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान; सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय, ज्याचा कोणी विचारच केला नव्हता
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान, सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय...
  • सोनं विसरा, हा पर्याय पाहा

  • गुंतवणुकीचा सर्वात मोठा 'गेम' उघड

  • एका निर्णयाने तुमचं नशीब बदलू शकतं

View All
advertisement