न्यू हायस्कूल, करमाड येथे तब्बल 38 वर्षे अध्यापन करणारे दत्तात्रय राऊत हे विद्यार्थ्यांमध्ये प्रेम आणि शिस्तीचं प्रतीक मानले जात. साधा स्वभाव, शब्दात माया आणि कामात निष्ठा या गुणांनी त्यांनी आपलं आयुष्य शिक्षणाला वाहिलं. मात्र गेल्या दीड वर्षांपासून ते पोटाच्या आजाराने त्रस्त होते. उपचार सुरू असतानाच गुरुवारी त्यांच्या राहत्या घरी त्यांची प्राणज्योत मालवली.
advertisement
मुलं सांभाळत नाहीत, 75 वर्षांच्या आजोबांची तक्रार, प्रांताधिकाऱ्यांनी अशी घडवली अद्दल, Video
भावाच्या निधनाची बातमी जालना येथील त्यांची मोठी बहीण प्रयागबाईंना मिळताच त्यांना दु:ख सहन झालं नाही. त्या थेट कोसळल्या. आयुष्यभर जपलेलं बंधाचं नातं, आठवणींचा ओघ आणि भावाच्या विरहाची तीव्र वेदना हा मानसिक धक्का त्यांच्या प्रकृतीला सहन झाला नाही. मुलगा लक्ष्मीकांत आणि नातू मंगेश यांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले, पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
या बहीण-भावाच्या निधनानंतर करमाड आणि जालना परिसरात शोक व्यक्त केला जात आहे. एकाच दिवशी भाऊ–बहिणीचं असं जाणं हे नात्याच्या प्रेमाची, जिव्हाळ्याची आणि एकमेकांवरील मायेची जणू शाश्वत कहाणी बनून राहत आहे. दत्तात्रय राऊत यांच्यावर करमाड येथे, तर प्रयागबाई जाधव यांच्यावर जालना येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. दोन्ही ठिकाणी हळहळ आणि डोळ्यांतून न बोललेली वेदना स्पष्ट जाणवत होती.






