काय म्हणाले मनोज जरांगे? "विधान परिषदेत निवडून आलेले सर्व आमदार बावळट आहेत, ज्या आमदारांनी विधान परिषदमध्ये मतदान केले, त्यांना मराठ्यांनी निवडून दिले. मराठ्यांचे मतदान घेऊन आमदार झाले. मग मराठ्यांच्या दारात डीजे लावून शिव्या दिल्या तर मी सहन करणार नाही, ज्या मराठा आमदारांनी विधान परिषदेमध्ये ओबीसींचा नेता निवडून आला, त्याने त्रास दिला तर त्या मराठा आमदाराला आता आधी पाडा, कशाला मराठ्यांच्या नादी लागता मराठ्यांशिवाय तुमचे जमत नाही" असा गंभीर इशारा मनोज जरांगेंनी दिला आहे.
advertisement
जरांगेंची भाषा घसरली:
यावेळी भाषणात बोलताना मनोज जरांगे राज्य सरकार आणि ओबीसी नेते छगन भुजबळांवर तुटून पडले. “छगन भुजबळ मला चौथी शिकलेला, गावठी म्हणाले होते. आता भुजबळांनी समोर यावं मी त्यांना कचका दाखवतो “असं जरांगे म्हणाले. यावेळी बोलताना जरांगेंनी छगन भुजबळांचा पुन्हा एकदा एकेरी भाषात उल्लेख केला. “वेळ आली तर 15 दिवसांच्या आत ओबीसी समाजाचं 27 टक्के आरक्षण रद्द करून दाखवेन, पण मला ओबीसी समाजाचं वाटोळ करायचं नाही, म्हणून मी शांत आहे, असं जरांगे म्हणाले.”
राज्य सरकारला इशारा: यावेळी जरांगेंनी राज्य सरकारला गंभीर इशारा दिला आहे. “सरकारने आम्हाला फसवलं, ही भावना आमच्यामध्ये आता वाढीस लागली आहे. त्यामुळे सरकारने सावध रहावं…सरकारने मराठा आरक्षणाबाबत तात्काळ ठोस निर्णय न घेतल्यास आगामी निवडणुकीत त्यांचे सर्वच्या सर्व 288 उमेदवार मराठे पाडतील.” असा गंभीर इशारा मनोज जरांगेंनी राज्यसरकारला दिला आहे. दुसरीकडे सगे सोयरेंच्या अध्यादेशाची अंमलबजावणी करण्यासाठी मनोज जरांगेंनी सरकारला दिलेली मुदत देखील आता संपली आहे. त्यामुळे येत्या 20 तारखेला मराठा समाजाची महत्वपूर्ण बैठक अंतरवाली सराटीमध्ये पार पडणार आहे. त्यामध्ये मराठा समाजाच्या आंदोलनाची पुढील भूमिका ठरवणार असल्याचं जरांगेंनी जाहीर केलं आहे.
