महाराष्ट्रातील जागतिक वारसा स्थळांची माहिती आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवण्यासाठी ‘फॅमलरायझिंग टूर’ या उपक्रमांतर्गत विविध देशांतील पर्यटक राज्यात येत आहेत. या कार्यक्रमात ब्राझील, चीन, जर्मनी, जपान, मलेशिया, रशिया, दक्षिण कोरिया, श्रीलंका, नेदरलँड, इंग्लंड, अमेरिका आणि व्हिएतनामसह अनेक देशांतील पर्यटन इन्फ्लुएन्सर्स, टूर ऑपरेटर्स आणि पत्रकार सहभागी झाले आहेत.
advertisement
या दौऱ्याचा भाग म्हणून नेदरलँडमधील सुमारे 30 पर्यटकांनी 1 ते 3 मार्चदरम्यान अजिंठा आणि वेरूळ लेणी या ऐतिहासिक स्थळांना भेट दिली. 3 मार्च रोजी संध्याकाळी त्यांनी शहरातील जुना भाग पाहण्यासाठी रिक्षातून फेरफटका मारला. या वेळी त्यांनी एका मिठाई दुकानात इमरतीचा आस्वाद घेतला तसेच कापड दुकानात खरेदीही केली. त्यानंतर हे पर्यटक पुढील प्रवासासाठी नाशिककडे रवाना झाले.
नाशिकला पोहोचल्यानंतर नेदरलँडमधील हिमानी या महिला पर्यटकांचे इअर बड्स हरवल्याचे लक्षात आले. त्यांनी तात्काळ एमटीडीसीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून माहिती दिली. त्यानंतर एमटीडीसीच्या अधिकाऱ्यांनी रात्रीच शोधमोहीम सुरू केली. पर्यटकांनी भेट दिलेल्या दुकानांतील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले तसेच संबंधित रिक्षाचालकांचा शोध घेण्यात आला. अखेरीस एका रिक्षाचालकाकडे ते इअर बड्स सापडले. रिक्षातून प्रवास करताना ते इअर बड्स खाली पडले होते. सापडलेले इअर बड्स विमानाने मुंबईला पाठवण्यात आले. हरवलेली वस्तू परत मिळाल्यानंतर पर्यटकांनी एमटीडीसीच्या तत्परतेचे कौतुक केले.
परदेशी पर्यटक विश्वासाने भारतात येतात. त्यांचा प्रवास सुरक्षित आणि सुरळीत व्हावा, ही आपली जबाबदारी आहे. पर्यटकांनी भारतातून चांगल्या आठवणी घेऊन जाव्यात, या भावनेतून एमटीडीसीच्या कर्मचाऱ्यांनी इअर बड्स शोधण्यासाठी तातडीने प्रयत्न केले आणि त्यात यश मिळाले, अशी माहिती एमटीडीसीचे उपसंचालक विजय जाधव यांनी दिली.
हरवलेले इअर बड्स परत मिळाल्यानंतर नेदरलँडच्या पर्यटक हिमानी यांनी एमटीडीसीच्या अधिकाऱ्यांना फोन करून आभार मानले. छोट्या-छोट्या गोष्टींचीदेखील भारतात इतकी काळजी घेतली जाते, ही कौतुकास्पद बाब आहे. मला हा टूर सुरक्षित आणि कुटुंबासोबत असल्यासारखा वाटला, असे त्यांनी सांगितले.






