संभाजीनगरात रंगाचा बेरंग, रस्त्यावरून जात होती तरुणी, विकृताने थेट गळ्याला लावला चाकू, धडकी भरवणारी घटना
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
छत्रपती संभाजीनगर येथील एका चौकात काही टवाळखोर तरुणांनी एका मुलीवर थेट चाकू उगारल्याचा प्रकार घडला आहे. घटनेचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे.
अविनाश कानडजे, प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर शहरात गुन्हेगारांना पोलिसांचा धाक उरला आहे की नाही, असा प्रश्न उपस्थित करणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. मुकुंदवाडी परिसरातील संजयनगर येथील अण्णा भाऊ साठे चौकात काही टवाळखोर तरुणांनी एका मुलीवर थेट चाकू उगारल्याचा प्रकार घडला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, शहरात खळबळ उडाली आहे.
नशेत धुंद तरुणांची दहशत
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, संबंधित तरुणांनी दारू आणि गांजासारख्या अंमली पदार्थांचे सेवन केलं होतं. नशेत धुंद असलेल्या या टोळक्यानं रस्त्यावरून जाणाऱ्या एका मुलीला अडवून तिच्यावर चाकू उगारला. या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. यावेळी घटनास्थळावरील काही नागरिकांनी मध्यस्थी केल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र भरवस्तीत दिवसाढवळ्या असा प्रकार घडल्याने महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
advertisement
सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
घटनेच्या वेळी उपस्थित असलेल्या काही प्रत्यक्षदर्शींनी हा सर्व प्रकार आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये तरुण आक्रमक भाषेत दादागिरी करताना आणि मुलीला धमकावताना दिसत आहेत. तसेच तो हातात चाकू घेऊन मुलीच्या अंगावर धावून जाताना दिसत आहे.
advertisement
या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्याची अद्याप कोणतीही माहिती मिळाली नाही. मात्र हा व्हिडीओ समोर आल्यानंतर नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या सर्व संशयित तरुणांना तात्काळ शोधून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.
Location :
Aurangabad,Maharashtra
First Published :
Mar 05, 2026 1:39 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
संभाजीनगरात रंगाचा बेरंग, रस्त्यावरून जात होती तरुणी, विकृताने थेट गळ्याला लावला चाकू, धडकी भरवणारी घटना









