छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठासाठी प्राध्यापकांची भरती होणार आहे. ही भरती काही कारणास्तव स्थगित करण्यात आली होती. पण परत आता नव्याने ही भरती प्रक्रिया होणार आहे. यासाठी अनेक उमेदवारांकडून अर्ज हे मागे देण्यात आलेले आहेत.
वर्षभरापूर्वी स्थगित झालेली डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील 73 प्राध्यापकांची भरती प्रक्रिया आता नव्याने राबविण्यात येणार आहे. नव्याने लागू झालेल्या 10 टक्के आरक्षणाचा समावेश करून पद भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. जाहिरात नव्याने प्रसिद्ध होणार असली तरी आधी अर्ज केलेल्या 5 हजार 815 जणांचे अर्ज ग्राह्य धरले जाणार आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आलेली आहे. 15 वर्षानंतर ही प्रक्रिया होत आहे.
advertisement
जीवघेणे रिल्स बनवत आहात, स्टंटबाजी करत आहात तर सावधान!, पोलीस करू शकतात ही कारवाई
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने ऑगस्ट 2023 मध्ये प्राध्यापकांच्या 73 पदांची भरती प्रक्रिया सुरू केली होती. त्यावेळी या पदांसाठी तब्बल 5815 उमेदवारांनी अर्ज केले होते. मात्र, या अर्जाची छाननी करण्यापूर्वी राजभवनकडून या भरतीला स्थगिती देण्यात आली. तत्कालीन कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांचा कार्यकाळ संपताना ही भरती प्रक्रिया राबविली जात असल्याने अनेकांनी त्यावर आक्षेप घेतला होता. त्याची दखल घेत राजभवनने ही स्थगिती दिली होती. आता वर्षभरानंतर ही प्रक्रिया नव्याने राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेच्या सोमवारी झालेल्या बैठकीत तसा निर्णय घेण्यात आला.
राज्यात एसईबीसी प्रवर्गाला 10 टक्के आरक्षण नव्याने लागू झाले आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी उमेदवारांच्या मुलाखती झाल्या नसतील, अशा सर्व भरती प्रक्रिया स्थगित करून एसईबीसी आरक्षणानुसार नव्याने तपासून प्रक्रिया राबविण्याचे आदेश राज्य सरकारने सर्व विद्यापीठांना नुकतेच दिले आहेत.