जिन्सीतील संजयनगर येथून शेख फिरोज हबीब शेख (42) याला अटक करण्यात आली, तर साताऱ्यातून इस्माईल शेख उर्फ आदिल हाजी शेख (32) याला ताब्यात घेण्यात आले. गुन्हे शाखेच्या पथकाने घर आणि दुकानांवर छापे मारून मोठ्या प्रमाणात मांजा जप्त केला. फिरोजकडून 51 गट्टे तर इस्माईलकडून 4 गट्टे जप्त झाले.
न्यायालयाने दोघांना एक आणि दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.दोन्ही आरोपी अनेक वर्षांपासून पतंग आणि नायलॉन मांजा विक्री करत असल्याचे तपासात समोर आले. इस्माईलने सोशल मीडियावरून ऑर्डर घेत असल्याचा कबुलीजबाब दिला. पोलिसांच्या भीतीने त्यांनी मांजा घरातील लपवलेल्या ठिकाणी दडवून ठेवला होता.
advertisement
4 डिसेंबरला आई-वडिलांबरोबर दुचाकीवर जात असताना तीन वर्षीय बाळाच्या गळ्यात नायलॉन मांजा अडकल्याने गंभीर जखम झाली होती. त्याला वीसपेक्षा जास्त टाके पडले. सध्या त्याची प्रकृती सुधारत असून ऑक्सिजनची गरज उरलेली नाही. सोमवारी त्याने आई-वडिलांना हाक मारल्याने पालकांनी दिलासा व्यक्त केला. कठोर कारवाईचे आदेश दिला आहे.या प्रकरणाची मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने गंभीर दखल घेतली आहे. बाळाला झालेल्या वेदना आणि त्रासाबाबत भरपाई का देऊ नये? ती रक्कम जबाबदार अधिकाऱ्यांकडूनच का वसूल करू नये? असा सवाल न्यायालयाने राज्य शासनाला केला आहे.खंडपीठाने क्षेत्रातील सर्व पोलिस आयुक्त आणि अधीक्षकांकडून केलेल्या कारवाईचा अहवाल मागवला असून पुढील सुनावणी 16 डिसेंबरला होणार आहे.
पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना नायलॉन मांजा विरोधातील कारवाई अधिक कठोर करण्याचे आदेश दिले आहेत. विक्रेत्यांवर बीएनएस 110, 223 आणि पर्यावरण संरक्षण कायद्यानुसार गुन्हे दाखल होतील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. सोमवारी सुमारे 25 पतंग विक्रेत्यांची पोलिस आयुक्तालयात बैठक घेऊन त्यांना नियमांचे पालन करण्याचे निर्देश देण्यात आले. गुन्ह्यांचा तपास आता वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे दिला जाणार असून तस्करीचे धागेदोरे शोधण्यासाठी विशेष चौकशी केली जाईल.
मुख्य सरकारी वकील अमरजितसिंह गिरासे यांनी न्यायालयाला सांगितले की नायलॉन मांजाच्या उत्पादन, साठवणूक, खरेदी-विक्रीवर संपूर्ण बंदी लागू आहे. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी विविध संस्थांची संयुक्त समिती कार्यरत आहे. घटनेनंतर शहरात तीन गुन्हे दाखल करून विक्रेत्यांना अटक करण्यात आली आहे.
