छत्रपती संभाजीनगर : एखाद्या महिलेने जर ठरवले तर ती महिला कितीही अडचणींवर मात करत आपली स्वप्न पूर्ण करू शकते आणि समाजात एक प्रेरणादायी उदाहरण म्हणून सर्वांसमोर आदर्श ठेऊ शकते, हे एका महिलेने सिद्ध करून दाखवले आहे. आज अशाच एका महिलेची प्रेरणादायी कहाणी आपण जाणून घेणार आहोत.
प्रीती जाधव असे या महिलेचे नाव आहे. त्या छत्रपती संभाजीनगर शहरातील रहिवासी आहेत. त्यांनी स्वतःचा पार्लरचा व्यवसाय सुरू केला आणि या व्यवसायाच्या माध्यमातून आज महिन्याला चांगले उत्पन्न कमावत आहेत. लोकल18 शी बोलताना त्यांनी आपला हा प्रवास कसा झाला, याबाबत माहिती दिली.
advertisement
छत्रपती संभाजीनगर शहरातील वाळूज परिसरामध्ये प्रीती जाधव राहतात. त्यांच्या आई-वडिलांकडे आर्थिक परिस्थिती नाजूक होती. दोन बहिणी, भाऊ असा परिवार, यामुळे अठराव्या वर्षीच घरच्यांनी त्यांचे लग्न करून दिले. घरामध्ये सासू-सासरे पती-पत्नी आणि त्यानंतर तीन मुले झाली. त्यांचे पती वाळूज परिसरामध्ये एका खासगी कंपनीत कामाला आहेत. तसेच 7 जणांचे कुटुंब आणि कमावणारी व्यक्ती एक असल्याने आर्थिक अडचण जाणवू लागली. यातच बँकेकडून कर्ज काढून घर घेतल्याने घर खर्च आणि बँकेचे हप्ते फेडणे कठीण जाऊ लागले. यामुळे त्या आर्थिक, मानसिकरित्या त्या खचल्या. घर कसे चालवावे आणि हप्ते कसे फेडावे, असा प्रश्न आमच्या समोर उभा होता.
या सर्व परिस्थितीत आपण आपला व्यवसाय सुरू करावा, असा विचार त्यांच्या मनात आला. त्यात प्रीती यांनी लग्नाच्या अगोदर पार्लरचा कोर्स केला होता. त्यामुळे आता आपण आपला व्यवसाय सुरू करावा या आणि यातून आपल्या घरला हातभार लावावा. पण व्यवसाय सुरू करायचा म्हटल्यावर त्यासाठी भांडवल लागते. तो त्यांच्याकडे नव्हता. म्हणून त्यांनी आधी आपण एखाद्या कंपनीमध्ये काम करावे, असा विचार केला.
यानंतर त्यांनी दोन-तीन महिने कंपनीमध्ये कामही केले आणि त्यानंतर आता काही झाले तरी आपण आपला पार्लरचा व्यवसाय सुरू करायचा, असे त्यांनी ठरवले. त्यांनी त्यांच्या घरातूनच पार्लरच्या व्यवसायाला सुरुवात केली. सुरुवातीला त्यांच्याकडे जा महिला यायच्या त्यांना त्यांनी फ्रीमध्ये सर्व काही करुन दिला आणि नंतर हळूहळू त्या व्यवसाय वाढवत गेल्या. त्यानंतर त्यांना जनशिक्षण संस्थेविषयी माहिती मिळाली. त्याठिकाणी त्यांनी प्रवेश घेतला आणि या ठिकाणी त्यांनी तीन महिने पार्लरचा कोर्स केला आणि त्यानंतर त्यांनी पार्लरचा मोठा सेटअप तयार केला. आज आपल्या या व्यवसायातून त्या महिन्याला 50 ते 60 हजार रुपयांचे उत्पन्न कमवत आहेत. तसेच त्या सध्या सरकारच्या वतीने पार्लरचे क्लासेसही घेत आहेत आणि त्यातूनही त्या मुलींना रोजगार उपलब्ध करून देण्याचे काम करतात, अशी माहिती त्यांनी दिली.
एखाद्या महिलेने जर काही करायचे ठरवले आणि कधी अडचणी आल्या तरी त्यावर मात करून त्या स्वतःला सिद्ध करून दाखवू शकतात, असे प्रीती सांगतात. प्रीती या इतर महिलांसाठी खूप मोठी प्रेरणा आहेत. यातून अनेक महिला प्रेरणा घेऊन स्वतःसाठी काहीतरी करू शकतात, असा त्यांचा प्रवास आहे.