जालना : सिंधुदुर्गच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळलाय. त्यामुळे राज्यभरात शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. राज्यात पहिल्यांदाच शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याची घटना घडली आहे. या गंभीर मुद्यावरून विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानं राज्यभरातील शिवप्रेमी संतप्त झालेत. अवघ्या 8 महिन्यात पुतळा कोसळलाय. 4 डिसेंबर 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्री मोदींनी पुतळ्याचं लोकार्पण केलं होतं. पुतळ्यावर 5 कोटींचा खर्च करण्यात आला होता. पुतळा कोसळल्यामुळे संतप्त झालेले आमदार वैभव नाईक यांनी मालवण येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाची तोडफोड केली.
advertisement
मनोज जरांगे संतापले
मालवणमध्ये छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेवरून मनोज जरांगे पाटील संतापले आहेत. शिवरायांच्या पुतळ्याचं काम करणाऱ्याला जेलमध्ये टाकलं पाहिजे, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. याचं उद्घाटन कुणी केलं, यात राजकारण करून उपयोग नाही, कारण काम करणारा कुणीतरी स्थानिक नेता असेल, निकृष्ठ दर्जाचं काम केलं असेल, यांना दर्जाच नाही हे फक्त पैशांसाठी काम करतात, त्यामुळे यांना उचलून जेलमध्ये टाकलं पाहिजे, अशी प्रतिक्रिया मनोज जरांगेंनी दिली आहे.
वाऱ्याने कोसळला पुतळा
दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या घटनेबाबत प्रतिक्रिया दिली आहे. ‘टीका करायला त्यांच्याकडे वेळच वेळ आहे, त्यांच्याकडे मी लक्ष देत नाही. झालेली घटना योग्य नाही, छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे. तो पुतळा नेव्हीकडून उभारला गेला होता, त्याचं डिझाईन नेव्हीने तयार केलं होतं’, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.
‘तिथे 45 किलोमीटर प्रती तास असा वारा वाहत होता, त्यामुळे पुतळ्याचं नुकसान झालं आहे. पालकमंत्री रवींद्र चव्हाण घटनास्थळी जात आहेत. नेव्हीचे अधिकारी, आमचे काही अधिकारी उद्या पाहणी करतील. छत्रपती शिवाजी महाराज आमचं आराध्य दैवत आहे, हा पुतळा आम्ही पुन्हा दिमाखात आणि मजबुतीने उभा करू. कायदा हातात घेण्याचा अधिकार कुणालाही नाही. या राज्यात शांतात राहिले पाहिजे, यासाठी सगळ्यांनी काळजी घ्यावी’, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.