बेळगाव: देशभरात ऑगस्ट महिन्यात पावसाने धुमशान घातलं आहे. देवभूमी उत्तराखंडमध्ये निसर्गाचा प्रकोप पाहण्यास मिळाला. त्यानंतर आता देशभरात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे. अशातच महाराष्ट्राच्या सीमेवर असलेल्याा बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती इथं ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली. अनेक वाहनं ही पाण्यात वाहून गेली आहे. पावसाच्या या रौद्ररुपामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे.
advertisement
कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती तालुक्यात ढगफुटी झाली आहे. मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणी पूरसदृश स्थिती निर्माण झाली असून, काही ठिकाणी ढगफुटीसदृश पाऊस झाला आहे.
या पावसाचा सर्वाधिक फटका सौंदत्ती येथील प्रसिद्ध रेणुका देवी मंदिराला बसला आहे. पावसामुळे मंदिराच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं असून, काही ठिकाणी वाहनंही वाहून गेल्याच्या घटना घडल्या आहेत. रस्त्यांवर पाणी आल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे, त्यामुळे भाविकांची मोठी गैरसोय झाली आहे.
याव्यतिरिक्त, बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यासह इतर काही भागांतही जोरदार पाऊस सुरू आहे. यामुळे स्थानिक नद्यांची पाणीपातळी वाढली आहे आणि काही पूल पाण्याखाली गेल्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला असून, सुरक्षित ठिकाणी राहण्याचं आवाहन केलं आहे.