अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने नामचिन गुन्हेगारी टोळी असलेल्या आंदेकरांच्या कुटुंबातील दोन सदस्यांना महापालिका निवडणुकीची उमेदवारी दिली आहे. पुण्याच्या प्रचारात यावरून विरोधक सरकारला सुनावत असताना मुख्यमंत्री फडणवीस यांनीही अजित पवार यांना कडक शब्दात सुनावले.
मुख्यमंत्र्यांनी अजित पवार यांना झापले
फडणवीस म्हणाले, गुन्हेगारांना राजकारण आणणे फार खूप चुकीचे आहे. राजकीय पक्षाने गुन्हेगारांना तिकीटे द्यायची आणि मग ते इकडून उभे आहेत, तिकडून उभे आहेत, असे सांगायचे, हे योग्य नाही, अशा शब्दात त्यांनी अजित पवार यांना सुनावले. अजित पवार यांनी गुन्हेगारांच्या घरात तिकीटे देण्यावरून हात झटकले. आम्ही सचिन खरात यांच्या आरपीआय गटाला तिकीटे दिली होती. त्यांनी आंदेकरांना तिकीटे दिली असतील, असे सांगत अजित पवार यांनी वेळ मारून नेली. यावरूनही फडणवीस यांनी सुनावले.
advertisement
कोयता गँगचा नायनाट करा-तुम्हीच सांगायचे आणि तुम्हीच गुंडांच्या घरात तिकीटे द्यायची, हे वागणं बरं नव्हं
अजित पवार यांच्याकडून अशा वर्तनाची मला अजिबात अपेक्षा नाहीये. शेवटी आपण ज्यावेळी सांगतो कोयता गँग हद्दपार करा, गुन्हेगारी हद्दपार करा आणि आपणच गुन्हेगारांना तिकीटे देतो हे कितपत योग्य आहे? असा सवाल फडणवीस यांनी विचारला. ज्यांना अजित पवार यांनी तिकीटे दिली आहेत त्यांच्या कुटुंबातील लोक अतिशय नामचिन गुन्हेगार आहेत. पुण्यात टोळ्या चालवणारे हेच लोक आहेत. पुण्यात हिंसा घडवून आणणारे खून करणारे, खंडणी वसूल करणारे हे गुन्हेगार आहेत. अशा लोकांना निवडणूक लढविण्याची व्यवस्था आपण करतो, त्यावेळी आपण आपले शहर कुठे नेतोय, याचा विचार झाला पाहिजे, असे फडणवीस म्हणाले.
राजकीय पक्ष गुन्हेगारांना आश्रय देणार असेल तर...
जर राजकीय पक्षच गुंडांच्या घरात तिकीटे देणार असेल, त्यांना आश्रय देणार असेल तर पोलिसांच्या मानसिकतेवर विपरीत परिणाम होतो. मनोधैर्य खचते, असे सांगत अजित पवार यांच्यावर फडणवीस यांनी टीका केली.
शासनाने पोलिसांसाठी काय केले? फडणवीसांनी विकासकामांचा पाढा वाचला
शहरं मोठी झाली, सीसीटीव्ही वाढवले आहेत. एआयचा वापर करून स्ट्रीट क्राइम संपविण्याचा आमचा प्रयत्न आहे. गुन्हा लगेचच डिटेक्ट होतो. जवळपास ५० हजारांची पोलीस भरती पूर्ण केली, ६२ साली पोलिसांचे सर्विस रुल तयार झाले होते, २०२४ नंतर मी बदलला, पोलिसांच्या वसाहतींचे आधुनिकीकरण केले, असेही फडणवीस यांनी सांगितले.
