महायुती सरकारमधील अनेक मंत्र्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे सरकारच्या प्रमुखांना अनेक वेळा स्पष्टीकरण द्यायची वेळ आली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी अनेक वेळा कडक तंबी दिल्यानंतरही सरकारमधल्या मंत्र्यांची वादग्रस्त विधाने काही केल्या थांबत नाहीत. शिरसाट यांच्या वादग्रस्त वक्तव्यासंदर्भात आज अमरावती दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्री फडणवीस यांना विचारले असता त्यांनी मंत्री महोदयांची बाजू घेतली.
मंत्री कधीकधी गमतीने पण बोलतात...
advertisement
मंत्री एखाद्या भाषणात कधीकधी गमतीने पण बोलतात. प्रत्येक गोष्टीचा आपण बाऊ करू लागलो, तर ते योग्य ठरणार नाही. काही वक्तव्ये ही गंभीर असतात, तशीच चुकीचीही असतात, पण शिरसाट जे बोलले त्यांचा उद्देश मला चुकीचा वाटत नाही, असे म्हणत मुख्यमंत्री फडणवीस यांनी शिरसाट यांची कड घेतली. तसेच येथून पुढे बोलताना मंत्री म्हणून संयमाने बोलले पाहिजे, असा सल्लाही त्यांनी दिला.
फडणवीसांनी बोर्डीकर यांचीही बाजू घेतली
दुसरीकडे अधिकाऱ्याच्या कानफटीत मारण्याची धमकी देणाऱ्या मंत्री मेघना बोर्डीकर यांच्याविषयी फडणवीस यांना विचारले असता, मेघना बोर्डीकर यांच्याशीही माझे बोलणे झाले. माझे वक्तव्य अर्धवट दाखविण्यात येत आहे, असे त्या मला म्हणाल्या. मला भेटून त्या सगळी माहिती देणार आहेत, असे फडणवीस म्हणाले.
संजय शिरसाट नेमके काय म्हणाले होते?
एका कार्यक्रमाप्रसंगी बोलताना राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी वादग्रस्त विधान केले. वसतिगृहासाठी लागेल तेवढा निधी देतो. तुम्ही पाच, दहा, पंधरा कोटी मागा. नाही दिले तर माझे नाव संजय शिरसाट नसेल. आपल्या बापाचे काय जातंय, सरकारचे पैसे आहेत, असे संजय शिरसाट म्हणाले. त्यांच्या याच विधानावर विरोधकांनी सडकून टीका केली आहे.
