पोलिसांकडून मराठी संघटनांच्या मोर्च्यावर सुरू असलेल्या दडपशाहीविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी काही सामान्य मराठी भाषिकांनादेखील ताब्यात घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. पोलिसांकडून मीरा रोड येथील ओम शांती चौकात मोठा फौजफाटा तैनात केला आहे. मराठी मोर्चेकरी दिसताच त्यांना ताब्यात घेण्यास सुरुवात केली. पोलिसांच्या आक्रमक पावित्र्यानंतर मोठा गोंधळ उडाला आहे.
advertisement
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळ परिसरात माध्यमांशी बोलताना सांगितले की, महाराष्ट्र हे लोकशाहीवादी राज्य आहे. मोर्चाला कोणताही नकार नाही. आज तेथील पोलीस आयुक्तांकडून माहिती घेतली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोर्चाला परवानगी देण्यात आली होती. सभेसाठीदेखील काल परवानगी देखील मागितली होती. पोलिसांनी ऐनवेळी त्यालाही परवानगी दिली. मात्र, मोर्चा काढणाऱ्या संघटनांनी पोलिसांनी सुचवलेल्या मार्गाला नकार दिला. त्यांना काही विशिष्ट मार्गावरून मोर्चा काढायचा होता. या दरम्यान काही गैरकृत्य होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी मार्गात बदल सुचवला होता. मात्र, त्याला नकार दिला गेल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
मोर्चाआधीच अविनाश जाधवांसह अनेकजण ताब्यात....
आज सकाळी मोर्चा काढण्याआधी मध्यरात्री, पहाटेच्या सुमारास पोलिसांनी मनसे नेते अविनाश जाधव यांना राहत्या घरातून ताब्यात घेतले. त्याशिवाय, मनसे आणि इतर संघटनांच्या पदाधिकार्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
मीरा-भाईंदरमधील एका मिठाईच्या दुकानदाराला मनसैनिकांनी मारहाण केली होती. त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर 3 जुलै रोजी बिगर मराठी व्यापारी दुकानदारांनी बंद पुकारत मोर्चा काढला होता. या मोर्चात मराठीभाषिकांविरोधातही टिप्पणी करण्यात आली होती. त्यानंतर मनसे नेते अविनाश जाधव यांनी हा मोर्चाला भाजपची फूस असल्याचा आरोप केला. मारहाणी मागील घटना सांगताना मराठी आणि महाराष्ट्राचा अपमान सहन कसा करायचा असा सवाल केला. या मोर्चाविरोधात 8 जुलै रोजी मोर्चा काढणार असल्याचे त्यांनी जाहीर केले होते. त्यानंतर विविध मराठी संघटनांसह आज मनसेने मोर्चाची हाक दिली होती. मात्र, मोर्चा आधीच पोलिसांनी जाधवांना ताब्यात घेतले.