मुंबई : महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकाच लिफ्टने प्रवास केला. फडणवीस आणि ठाकरेंच्या लिफ्टमधल्या या प्रवासाने अनेकांच्या भुवया उंचावल्या, तसंच ठाकरे आणि भाजप पुन्हा जवळ येत आहेत का? अशा चर्चाही सुरू झाल्या. ठाकरे आणि फडणवीस यांच्या लिफ्टमधल्या या प्रवासावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
advertisement
'कुणीही लिफ्ट मागितली तरी ही लिफ्ट सहाव्या मजल्यापर्यंत पोहोचू शकणार नाही. त्यांनी लिफ्ट शिफ्ट केल्यामुळे आम्ही जनतेच्या लिफ्टमध्ये आलो आणि महाराष्ट्रात जनतेच्या मनातलं सरकार स्थापन केलं', असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला.
'भाजपच्या 240 जागा आल्या, इंडिया आघाडीच्या तेवढ्याही आल्या नाहीत. काही लोक छाती फुगवून फिरत आहेत आणि गिरो तो टांग उपर. या देशातील जनतेने नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान बनवलं', असा पलटवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला.
आधी लिफ्टमध्ये भेट; मग चॉकलेट, भाजप-ठाकरेंमध्ये चाललंय काय?
हे अधिवेशन सरकारचं निरोपाचं अधिवेशन आहे, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली. या टीकेवरही एकनाथ शिंदेंनी प्रत्युत्तर दिलं. निरोप कोण कोणाला देईल, हे येणारा काळ ठरवेल. हे अधिवेशन निर्धाराचं आणि निश्चयाचं आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले. 'शेतकऱ्यांची कर्जमाफी म्हणत आहेत, शेतकऱ्यांच्या खात्यात आम्ही 50 हजार रुपये जमा केले. बांद्रा ते बांधा कधी पाहिला आहे का? इथे फिल्डवर काम करावं लागतं. लंडनमधल्या पंचतारांकित हॉटेलपेक्षा पंचतारांकित शेती चांगली नाही का?', असा टोलाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना लगावला.
मध्य प्रदेश सरकारप्रमाणे लाडली बहना योजना महाराष्ट्रातही लागू करण्याबाबतच्या चर्चा सुरू आहेत, त्यावरूनही मुख्यमंत्र्यांनी ठाकरेंवर निशाणा साधला. लाडकी बहीणपण करू आणि लाडका भाऊ पण करू, पण बोलणाऱ्यांचा भाऊ कुठे आहे? असा सवाल मुख्यमंत्र्यांनी विचारला आहे.