नागपुरात 18 महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू
नागपुरातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. कफ सिरपमुळे प्रकृती बिघडलेल्या १८ महिन्यांच्या चिमुकलीवर नागपूर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचारानंतरही तिला बरं वाटलं नाही, प्रकृती जास्त खालावत गेली आणि तिचा मृत्यू झाला आहे. कफ सिरप प्यायल्यानंतर तिला त्रास झाला होता. त्यामुळे तातडीनं तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं होतं. आतापर्यंत नागपुरात 36 मुलांवर उपचार सुरू आहेत.
advertisement
विषारी कफ सिरपमुळे नागपुरातील शासकीय रुग्णालयात 18 महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू. मध्य प्रदेशातील आणखी एका बाळाचा नागपुरातील शासकीय रुग्णालयात मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा खळबळ उडाली असून डॉक्टर आणि प्रशासनाने 2 वर्षांपेक्षा लहान मुलांना कफ सिरप न देण्याचं आवाहन केलं आहे. याशिवाय विषारी कफ सिरप विकणाऱ्या कंपनीविरोधात कारवाई करण्यात आली आहे. सरकारनेही अलर्ट जारी केला असून असे कफ सिरप विकणाऱ्या मेडिकल किंवा डॉक्टरांची माहिती देण्याचं आवाहन केलं आहे.
आरोग्य मंत्रालयाने दिली अपडेट
आरोग्य मंत्रालय आणि आरोग्य महासंचालनालयाने शिफारस केली आहे की 2 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नयेत आणि ते सावधगिरीने वापरावेत. औषध नियामकांनी अनेक औषध कंपन्यांच्या युनिट्सची चौकशी सुरू केली आहे. गुणवत्ता मानकांचे पालन न केल्याबद्दल काही युनिट्स बंद करण्यात आल्या आहेत. संभाव्य प्राणघातक औषधे बाजारात येण्यापासून रोखण्यासाठी औषध गुणवत्ता नियंत्रण आणि देखरेख यंत्रणा अधिक मजबूत करणे आवश्यक आहे.
मध्य प्रदेशातील डॉक्टरवर कारवाई
मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यात खोकल्याच्या सिरपचे सेवन केल्यानंतर अनेक मुलांचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणात चौकशी सुरू असताना प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात डॉ. प्रवीण सोनी यांना अटक करण्यात आली आहे. कोल्ड्रिफ (Coldrif) या खोकल्याच्या सिरपमुळे 14 मुलांचा मृत्यू झाल्याचा आरोप आहे. हे औषध डॉ. सोनी यांनी बेकायदेशीरपणे लिहून दिल्याचे समोर आले आहे.
कोल्ड्रिफनंतर आणखी एका कफ सिरपवर कारवाई
छिंदवाडा येथे किडनी फेल झाल्याने 11 बालकांचा मृत्यू झालेल्या प्रकरणानंतर कोल्ड्रिफ आणि नेक्स्ट्रो-डीएस या कफ सिरपवर बंदी घालण्यात आली आहे. त्याचबरोबर इंदूरमध्ये तयार होणाऱ्या डिफ्रॉस्ट सिरपला देखील बाजारातून परत मागवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.लोक आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण विभागाने इंदूरच्या आर्क फार्मास्युटिकल्स कंपनीविरुद्ध कारणे दाखवा नोटीस जारी केली आहे. तसेच डिफ्रॉस्ट सिरपचा बॅच क्रमांक 11198 बाजारातून रिकॉल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याशिवाय औषधि महानियंत्रक (भारत सरकार) तसेच हिमाचल प्रदेश आणि तमिळनाडूच्या औषध नियंत्रकांना पत्र लिहून आवश्यक ती कारवाई करण्यास सांगितले आहे.
दोन रसायनांबाबत विशेष अलर्ट
राज्य सरकारने सर्व औषध निर्माते, निरीक्षक, जिल्हा आरोग्य अधिकारी आणि वैद्यकीय महाविद्यालयांचे अधिष्ठाता यांना विशेष सल्ला पत्र जारी केले आहे. यात क्लोरफेनिरामाइन मलेट आणि फिनाइलफ्रिन एचसीएल या रसायनांच्या वापराबाबत विशेष काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. हे दोन्ही घटक खोकला-जुकामाच्या औषधांमध्ये सर्रास वापरले जातात. मात्र लहान मुलांना किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय यांचा वापर धोकादायक ठरू शकतो.
कफ सिरफबाबत सरकारच्या सूचना
1) 2 वर्षांखालील मुलांना कफ आणि सर्दीवरील कोणतीही औषधं देऊ नयेत.
2) 5 वर्षांखालील मुलांसाठी ही औषधं सामान्यतः शिफारस केलेली नाहीत. कारण, लहान मुलांमधील तीव्र कफ आणि सर्दीचे बहुतांश आजार स्वतःहून बरे होतात आणि त्यासाठी औषधांची गरज पडत नाही.
3) कफ आणि सर्दीवर प्राथमिक उपचार म्हणून नैसर्गिक उपायांना प्राधान्य देण्याचा सल्ला देण्यात आला आहे. यामध्ये पुरेसे पाणी पिणे, विश्रांती घेणे आणि आधार देणारे उपाय यांचा समावेश आहे.
4) औषधोपचार आवश्यक असल्यास, डॉक्टरांनी रुग्णाची काळजीपूर्वक तपासणी करून आणि जवळच्या देखरेखीखाली औषधं द्यावीत.
5) डॉक्टरांनी सांगितलेल्या डोस आणि उपचाराच्या कालावधीचे काटेकोर पालन करणे बंधनकारक आहे. एकाच वेळी अनेक औषधे मिसळून देणे टाळावे, असेही निर्देश आहेत.