काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांची बहुप्रतिक्षित युती अखेर आज जाहीर करण्यात आली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रदेशाध्यक्ष धैर्यवर्धन पुंडकर यांच्या उपस्थितीत या युतीची अधिकृत घोषणा करण्यात आली. यावेळी काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव सचिन सावंत, वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे देखील उपस्थित होते. मुंबईतील काँग्रेसचे प्रदेश मुख्यालय टिळक भवन येथील पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले की, जवळपास २५ वर्षानंतर आमची युती होत आहे. काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी हे नैसर्गिक मित्र आहेत. दोन्ही पक्षांमध्ये मतभिन्नता असू शकते, मात्र मनभेद नाही. संविधानाचे रक्षण करण्यासाठी आणि संविधानाची मूल्ये जपण्यासाठी दोन्ही पक्षांचे एकमत आहे. ही युती संख्येचा खेळ नसून विचारांचा मेळ असल्याचे त्यांनी सांगितले. आज मुंबईत युती झाली असून इतर ठिकाणबाबत चर्चा सुरू असल्याचेही सपकाळ यांनी म्हटले. तर, वंचित बहुजन आघाडीचे प्रदेशाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन फुंडकर यांनी म्हटले की, २०१४ ला हा योग जुळून आला असता तर भाजप जनतेच्या मानगुटीवर बसली नसती. हर्षवर्धन सपकाळ यांनी सकारात्मक भूमिका घेतली. त्यांनी प्रकाश आंबेडकर यांचे सोबत संवाद साधला आणि त्यातून इतक्या वर्षांनी एकत्र आलो असल्याचे फुंडकर यांनी सांगितले.
advertisement
वंचितला किती जागा?
या पत्रकार परिषदेत वंचित बहुजन आघाडीसोबतच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला जाहीर करण्यात आला. काँग्रेससोबतच्या आघाडीत वंचित बहुजन आघाडीला २२७ पैकी ६२ जागा सोडण्यात आल्या आहेत. तर, उर्वरित जागांवर काँग्रेसचे उमेदवार असणार आहेत. वंचितकडून जिल्हा समिती उमेदवारांबाबत निर्णय घेणार आहेत.
