भारतीय निवडणूक आयोगाने राज्यसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. राज्यातील ७ जागांसाठी निवडणूक होणार आहे. राज्यातील सध्याचे संख्याबळ पाहता महाविकास आघाडीच्या वाट्याला केवळ एक जागा येण्याची शक्यता आहे. या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार पक्ष) राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार निवडणूक लढवतील, अशी जोरदार चर्चा होती. मात्र, बुधवारी मुंबईत झालेल्या काँग्रेसच्या 'कामकाज सल्लागार समिती'च्या बैठकीत या नावावर तीव्र आक्षेप घेण्यात आल्याचे समजते.
advertisement
शरद पवारांच्या नावाला काँग्रेसचा विरोध का?
महाविकास आघाडीच्या वाटेला येणाऱ्या एका जागेवर सर्वसहमतीचे नाव म्हणून शरद पवार यांचे नाव समोर आले होते. ठाकरे गटाकडूनही पवारांच्या नावावर सहमती दर्शवण्यात आली होती. 'महाराष्ट्र टाईम्स'ने काँग्रेसमधील सूत्रांच्या हवाल्याने याबाबतचे वृत्त दिले आहे. काँग्रेसमधील एका गटाने शरद पवार यांच्या नावाला विरोध केला आहे.
गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसची भाजपसोबत जवळीक वाढत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. पवारांच्या पक्षाचे भाजपमध्ये विलीनीकरण होऊ शकते, अशी भीती काँग्रेसच्या एका गटाने व्यक्त केली आहे.
जर शरद पवारांना ही जागा सोडली आणि भविष्यात त्यांनी वेगळी भूमिका घेतली, तर महाविकास आघाडीची ही एकमेव जागाही महायुतीकडे जाऊ शकते, असा दावा काँग्रेस नेत्यांनी केला आहे. जुन्याच नेत्यांऐवजी आता महाविकास आघाडीने एखाद्या 'नव्या चेहऱ्याला' संधी द्यावी, असा सूर काँग्रेस नेत्यांनी लावून धरला आहे.
या सगळ्या घडामोडींवर "शरद पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यास काँग्रेस त्याला विरोध करू शकते, असे संकेत पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी दिले आहेत.
अंतिम चेंडू दिल्लीच्या कोर्टात!
राज्यातील काँग्रेस नेत्यांनी विरोध दर्शवला असला तरी, यावर अंतिम निर्णय दिल्लीतील पक्षश्रेष्ठीच घेणार आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, राज्यातील काँग्रेसचे एक शिष्टमंडळ लवकरच हायकमांडची भेट घेऊन आपली भूमिका मांडणार आहे.
