एका स्थानिक वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना अण्णामलाई यांनी 'बॉम्बे इज नॉट अ महाराष्ट्राज सिटी' अशा आशयाचं विधान केलं आहे. मुंबई हे महाराष्ट्राचं शहर नाही, या अण्णामलाई यांच्या वक्तव्यावर नव्या वादाला तोंड फुटलं असून विरोधकांकडून भाजपला घेरायला सुरुवात झाली आहे. हे विधान समोर येताच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी अण्णामलाई यांच्या विधानाचा निषेध केला आहे.
advertisement
अण्णामलाई नक्की काय म्हणाले?
मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचारात अण्णामलाई म्हणाले, "आम्हाला इथं ट्रिपल इंजिनचं सरकार हवं आहे. मुंबई हे देशातील एकमेव शहर आहे, जिथे ट्रिपल इंजिनचं सरकार असू शकतं. मोदीजी केंद्रात, देवेंद्र फडणवीस राज्यात आणि मुंबईत भाजपचा महापौर पाहिजे. कारण मुंबई हे महाराष्ट्राचं शहर नाही, (बॉम्बे इज नॉट महाराष्ट्राज सिटी) ते आंतरराष्ट्रीय शहर आहे. या शहराचं बजेट ७५ हजार कोटी इतकं आहे, हा काही कमी पैसा नाही. चेन्नईचं बजेट ८ हजार कोटी आहे. तर बंगळुरूचं १९ हजार कोटी आहे. त्यामुळे तुम्हाला प्रशासनात चांगले लोक बसवायला पाहिजे, जेणेकरून ते शहराच्या बजेटचा योग्य वापर होईल," असं विधान अण्णामलाई यांनी केलं.
अण्णामलाई यांच्या वक्तव्यावर संजय राऊतांनी टीका केली आहे. त्यांनी अण्णामलाई यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली आहे. "अण्णा फन्ना झन्ना विरूद्ध गुन्हा दाखल केला पाहिजे. हा १०६ हुतात्म्यांचा अपमान आहे. त्याला अटक करून मुंबईच्या बाहेर जाऊ दिलं नाही पाहिजे. अण्णा सरकारच्या थोबाडात मारून गेला. देवेंद्र फडणवीसांनी याचं उत्तर द्यायला हवं."
यावर प्रतिक्रिया देताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, हे अत्यंत चुकीचे विधान त्यांनी केलं आहे. मुंबई महाराष्ट्राची आहे आणि ती महाराष्ट्राचीच राहील. मुंबईला महाराष्ट्रापासून कुणीही तोडू शकत नाही."
