नेमकी घटना काय?
आज सकाळी १० वाजल्यापासून राज्यभरात मतमोजणीला सुरुवात झाली. दुधनी नगरपरिषदेसाठी देखील निवडणूक निर्णय अधिकारी आणि कर्मचारी मतमोजणी केंद्रावर हजर झाले होते. मात्र, ज्या स्ट्राँग रूममध्ये ईव्हीएम मशीन (EVM) सुरक्षित ठेवण्यात आल्या होत्या, त्या खोलीची चावी वेळेवर सापडली नाही. बराच वेळ शोध घेऊनही चावी न मिळाल्याने अधिकारी आणि उमेदवारांच्या प्रतिनिधींमध्ये चिंतेचे वातावरण पसरले होते.
advertisement
अखेर कुलूप तोडण्याचा निर्णय
मतमोजणीला विलंब होत असल्याचे पाहून आणि उपस्थित उमेदवारांचा संयम सुटत असल्याचे लक्षात घेता, प्रशासनाने अखेर मोठा निर्णय घेतला. निवडणूक नियमावलीनुसार आणि उपस्थित अधिकृत प्रतिनिधींच्या साक्षीने स्ट्राँग रूमचे कुलूप तोडण्यात आले. या संपूर्ण प्रक्रियेचे व्हिडिओ चित्रीकरणही करण्यात आले आहे जेणेकरून पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ नये.
मतमोजणीला विलंब
राज्यात इतर ठिकाणी 10 वाजता मतमोजणीला सुरुवात झाली असताना, दुधनीमध्ये मात्र या गोंधळामुळे मतमोजणी प्रक्रिया रखडली होती. चावी हरवल्याच्या या प्रकारामुळे प्रशासकीय बेजबाबदारपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
उमेदवारांची धाकधूक: निकालाला उशीर होत असल्याने उमेदवार आणि समर्थकांमध्ये धाकधूक वाढली असून केंद्राबाहेर समर्थकांनी मोठी गर्दी केली आहे. या प्रकरणाची चौकशी होण्याची शक्यता असून, चावी नेमकी कोणाकडे होती आणि ती कशी गहाळ झाली, याचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मागवला जाऊ शकतो.
