ठाणे : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते ठाण्यात राम जन्मभूमी आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या कारसेवकांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. देवेंद्र फडणवीस बाबरीवर चढले असतील आणि त्यांच्या वजनाने तो पडला असेल, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली होती, त्यांच्या या टीकेला फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
advertisement
'उद्धव ठाकरे म्हणाले बाबरी पडली तेव्हा फडणवीस लहान होते, मी लहान होतो, पण तुम्ही तेव्हा फोटो काढत होते. गर्वाने सांगतो मी कारसेवक होतो, बदायूच्या जेलमध्ये अटकेत होतो. माझा पहिला परिचय कारसेवक आहे, नंतर मंत्री म्हणून ओळख आहे. बाळासाहेब ठाकरे वाघ होते, तुमच्यासोबत असलेला एक नेता दाखवा जो कारसेवक होता, माझ्या वजनाने बाबरी काय, राम सोबत असल्यावर हिमालयही पाडणार,' असा पलटवार देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर केला.
ज्यांनी रामाला नाकारलं त्यांच्या मांडीला मांडी लावून बसलात, लाज वाटली पाहिजे. उद्धव ठाकरेंसोबत एक मंथराही आहे, त्यामुळे ते असं करतात, असं म्हणत फडणवीसांनी संजय राऊतांनाही टोला हाणला. ठाण्याचे महाभाग राम काय खातात सांगणारे, ते काय खातात बाजूला ठेवा, तुम्ही मात्र शेण खाता, अशी घणाघाती टीका फडणवीस यांनी जितेंद्र आव्हाडांवर केली आहे.
'हा क्षण आनंदाचा आहे, ज्याची प्रतीक्षा अनेक वर्ष होती. मुघलांनी राम मंदिर तोडून बाबरी बनवली. कलंकित ढाचा कार सेवकांनी पाडला, मात्र राम कपड्याच्या मंदिरात बसले होते. पंतप्रधान मोदींनी मंदिर निर्माण केले, त्या मंदिरात राम विराजमान होणार आहेत. राम मंदिराच्या लोकार्पणाला नाकारणारे हे कोण लोक आहेत? याच लोकांनी रामाचे स्थान नाकारले. जी लोक मंदिर कब और तारीख क्या? विचारत होती, त्यांच्या छातीवर बसून मंदिर बनवलं,' असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.