गोपीनाथ मुंडे यांनी सुरू केलेला दसरा मेळावा त्यांची लेक पंकजा मुंडे यांनी कोणताही खंड न पडू देता यंदाच्या वर्षीही घेतला. या मेळाव्याला पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे, धनंजय मुंडे, महादेव जानकर, तसेच भाजपचे आमदार उपस्थित होते. या मेळाव्याला धनंजय मुंडे यांनी संबोधित केले.
धनंजय मुंडेंनी आरक्षणाचं गणित मांडलं
धनंजय मुंडे म्हणाले, मराठा आरक्षणासाठी आम्हीदेखील प्रयत्न केले आहेत. कोणत्याही आरक्षणासाठी मी लढणारा कार्यकर्ता आहे. काहींना मराठ्यांसाठी ओबीसीमधून आरक्षण हवे आहे. पण केवळ स्वत:च्या फायद्यासाठी सगळे सुरू आहे. नुकताच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा निकाल लागला. या निकालामध्ये ओबीसी प्रवर्गाचा कट ऑफ हा 485 गुणांचा होता. तर, आर्थिकदृष्ट्या मागास वर्गाचा (EWS) कट ऑफ 450 गुणांचा होता. जर मराठा समाजातील उमेदवाराने EWS मधून परीक्षा दिली असती तर 450 गुणांवर उत्तीर्ण झाले असते. आता मात्र, ओबीसींचे आरक्षण घेऊन संधी मिळाली नाही हे वास्तव आहे. असे असताना हे कोणाला फसवत आहेत? असा सवाल करून मराठा समाजातील मुलांनी या आकडेवारीकडे डोळसपणे पाहायला हवे, असे आवाहन धनंजय मुंडे यांनी केले.
advertisement
शक्य तेवढं सगळं दिलं, अजूनही देण्याची भूमिका पण आता....
आर्थिकदृष्ट्या मागास वर्गाची गुणवत्ता यादी कमी गुणांची असतानाही केवळ ओबीसीतून आरक्षण घेणार हा हट्ट समाजाच्या हितासाठी नाही तर केवळ काही लोकांना खुर्च्या मिळवायच्या आहेत. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी नोकरी-शिक्षणासाठी सरकारला जेवढं शक्य होतं तेवढे दिले, अजूनही देत आहे. मराठा समाजाच्या आरक्षणावर आमचं काहीही म्हणणं नाही. पण आता मात्र, ह्याच्या ताटातून काढून त्या ताटात देऊ नये, असे ते म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्याकडून पंकजा मुंडे यांचे कौतुक
गोपीनाथ मुंडे यांनी सुरू केलेली दसरा मेळाव्याची परंपरा कोणताही खंड न पडू देता पंकजा यांनी सुरू ठेवल्याने धनंजय मुंडे यांनी त्यांचे कौतुक केले. यंदा पुरामुळे अतिवृष्टीमुळे विघ्न आले पण अशाही परिस्थितीत साध्या पद्धतीने का होईना पण दसरा मेळावा घेतला, असे धनंजय मुंडे म्हणाले.