धाराशिवच्या चोराखळी इथं एका २५ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. धाराशिव येथील साई कलाकेंद्रात नृत्य काम करणाऱ्या महिलेसोबत वाद झाल्यानंतर या तरुणाने टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती आहे. अश्रुबा अंकुश कांबळे असं आत्महत्या करणाऱ्या 25 वर्षीय तरुणाचं नाव आहे. कला केंद्रातील नर्तकीसोबत त्याचे प्रेमसंबंध होते, यातून दोघांमध्ये वाद झाला आणि अश्रुबाने जीवन संपवल्याचं सांगितलं जात आहे.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, अश्रुबा कांबळे हा रुई ढोकी या गावचा रहिवासी आहे. मागील पाच वर्षांपासून यांचं साई कलाकेंद्रात डान्स करणाऱ्या डान्सरसोबत अनैतिक प्रेमसंबंध सुरू होते. सोमवारी दोघंही शिखर शिंगणापूर येथे देव दर्शनाला गेले होते. देवदर्शन करून परत येत असताना, अश्रुबाला त्याच्या पत्नीचा फोन आला होता. यावरून नर्तकी आणि अश्रुबा यांच्यात वाद झाला.
या वादानंतर अश्रुबाने आत्महत्या करतो, अशी धमकी प्रेयसीला दिली होती. मात्र तिने याकडे दुर्लक्ष केलं. यानंतर अवघ्या काही वेळात अश्रुबाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेची माहिती येरमाळा पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. तसेच पोस्टमार्टम झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. येरमाळा पोलिसांनी आरोपी महिलेला ताब्यात घेतलं असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. महिलेनं अश्रुबाला त्रास दिला का? याचा तपासही पोलीस करत आहेत.
