शिवसेनेचे जिल्हा परिषदेचे एबी फॉर्म राजन साळवी यांनी भाजप आमदार राणा जगजीतसिंह पाटील आणि मल्हार पाटील यांना देत वाटप केल्याच्या मुद्द्यावरून शिवसेनेचा कार्यकर्ता आणि राजन साळवी यांच्यातील वादग्रस्त कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. त्यानंतर आता पुन्हा राजन साळवी यांच्यावरील नाराजीतून शिवसैनिकांनी त्यांना घेराव घातला.
निष्ठावंतांना डावललं, राजन साळवींना शिवसैनिकांचा घेराव
advertisement
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत निष्ठावंतांना डावलल्याने शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. अविनाश खापे नामक शिवसैनिकाने राजन साळवी यांना फोन करून जाब विचारला. तसेच निष्ठावंतांना तिकीटे द्यायची नसतील आम्हाला खुशाल सांगा, आम्हाला चादर-सतरंजी द्या आम्ही निवांत झोपतो, असे म्हणत त्याने आपल्या उद्विग्न भावनांना वाट मोकळी करून दिली.
राजन साळवींवर शिवसैनिकांच्या प्रश्नांच्या फैरी
राजन साळवी आणि शिवसैनिकांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. राणा पाटील यांचे चिरंजीव मल्हार पाटील यांच्याकडे शिवसेनेचा एबी फॉर्म गेलाच कसा? तुम्हाला निष्ठावंत दिसत नाही का? तुम्ही निष्ठावंतांना तिकीटे देणारच नाही का? अशा प्रश्नांच्या फैरी अविनाश खापे यांनी राजन साळवी यांच्यावर झाडल्या. तसेच शिवसैनिकांनी देखील त्यांना घेराव घालून जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत वाटप केलेल्या तिकीटावर नाराजी दर्शवली.
शिवसैनिकांनी घेराव घातला, राजन साळवींची अडचण झाली
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत निष्ठावंत शिवसैनिकांना डावल्याने शिवसैनिक आक्रमक झाले. तिकीट वाटपावरून आम्ही विचारलेल्या प्रश्नांची आम्हाला उत्तरे द्या, असे म्हणत शिवसैनिकांनी आक्रमकपणे साळवी यांना विचारले. शिवसैनिकांनी घेराव घातल्याने साळवींची चांगलीच अडचण झाली होती.
