धाराशिव : 'रिस्क' ही यशस्वी व्यवसायाची पहिली पायरी आहे, असं म्हणतात ते काही खोटं नाही. अनेक तरुण व्यावसायिकांनी हे सिद्ध करून दाखवलंय. शिवाय ज्ञान कधीच वाया जात नाही, मग ते पुस्तकी असो किंवा एखादी कला असो. याचाच अवलंब करून धिरज घरत हा तरुण आज लाखोंचा मालक आहे. ही संपत्ती त्याला वारसाहक्कात मिळालेली नाहीये, तर त्यानं स्वतः मोठ्या हिंमतीनं कमवलीये.
advertisement
धिरज घरत हा धाराशिवच्या वाशी तालुक्यातील पारगावचा रहिवासी. घरची परिस्थिती हलाखीची असल्यानं त्याला दहावीनंतर शिक्षण घेता आलं नाही. त्यानं आपल्या मामाच्या फॅब्रिकेशनच्या दुकानात (वेल्डिंग व्यवसाय) काम करायला सुरूवात केली. काम करता करता तो हा व्यवसाय बारकाईनं शिकला. मग त्यानं स्वतःचा व्यवसाय सुरू करायचं ठरवलं.
अडीच वर्षांपूर्वी त्यानं पारगाव इथं स्वतःचा फॅब्रिकेशनचा व्यवसाय सुरू केला. व्यवसायात पूर्ण तयारीनिशी उतरायचं त्यानं ठरवलं होतं. त्यामुळे सुरूवातीला 5 लाख रुपयांची मोठी गुंतवणूक केली. हा व्यवसाय फायद्याचा आहे, यातून बक्कळ नफा होणार याची त्याला खात्री होती. म्हणूनच ही मोठी रिस्क घेतली आणि जिचं फळही त्याला मिळालं. आज महिन्याकाठी त्याची उलाढाल आहे 1 लाखांची. कधीकाळी परिस्थितीमुळे शिक्षण सोडावं लागलं होतं, मात्र आज मेहनतीच्या जोरावर पठ्ठ्या लखपती झालाय.
धिरज सध्या एका कामगाराच्या मदतीनं स्वतः वेल्डिंगची कामं करतो. आपल्या दुकानात पेरणी यंत्र, कल्टीवेटर, ट्रॉली, गौराईचे स्टेज, शेतीपयोगी अनेक साहित्य तयार करून तो उत्तम आर्थिक उत्पन्न कमवतो. विशेष म्हणजे धिरजचं वय आहे फक्त 20 वर्षे आणि शिक्षण दहावी, तरीही आज तो लाखो रुपयांची उलाढाल करतो. त्याची जिद्द आणि संघर्ष खरोखर प्रेरणादायी आहे.