धाराशिव - सध्या सर्वत्र नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे. यानिमित्ताने आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त देशाच्या कानाकोपऱ्यातून कुलस्वामिनीच्या दर्शनासाठी भाविक तुळजापुरात दाखल होतात. तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी पायी जाणाऱ्या भाविकांच्या फराळाची व जेवणाची व्यवस्था करण्यात येते. मागील 23 वर्षांपासून ही परंपरा आजही सुरू आहे. याचबाबत लोकल18 च्या टीमने घेतलेला हा आढावा.
advertisement
शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त हजारो भाविक पायी तुळजापूरला दर्शनासाठी येतात. आंध्रप्रदेश, कर्नाटक या परिसरातून देखील मोठ्या संख्येने भाविक तुळजापूरला दर्शनासाठी पायी येतात. मातेच्या दर्शनासाठी पायी येणाऱ्या या भाविकांसाठी मागील 23 वर्षांपासून एक कौतुकास्पद उपक्रम राबवला जात आहे. उमरगा येथील तुळजाभवानी मित्र मंडळाच्या वतीने या सर्व पायी येणाऱ्या भाविकांसाठी जेवणाची व फराळाची व्यवस्था करण्यात येते.
नवरात्री विशेष : मुंबईत रेल्वेकडून राबवली जातेय नारीशक्ती नवदुर्गा मोहीम, नेमकी काय आहे ही संकल्पना?
मागील 23 वर्षांपासून मोफत हे अन्नछत्र सुरू आहेत. शारदीय नवरात्र महोत्सवाच्या सुरुवातीपासून ते कोजागिरी पौर्णिमेपर्यंत 24 तास हे अन्नछत्र सुरू असते, अशी माहिती यावेळी देण्यात आली. आपल्याला देवाच्या दर्शनासाठी जाता आले नाही तर देवाच्या दर्शनासाठी जाणाऱ्यांची सेवा केली तरीही देव पावतो, असे म्हटले जाते. याचीच प्रचिती उमरगा येथे या मंडळाच्या कौतुकास्पद कार्याकडे पाहून येते. मागील 23 वर्षांपासून तुळजापूरला पायी चालत जाणाऱ्या भाविकांच्या जेवणाची आणि फराळाची व्यवस्था करण्याचे हे कार्य खरंच कौतुकास्पद आहे.