पवनचक्कीच्या कामाविरोधात तक्रार करून उपोषण केल्याच्या रागातून पवनचक्की कंपनीच्या गुंडांनी या तरुण शेतकऱ्याला जबर मारहाण केली आहे. या मारहाणीत संबंधित शेतकरी गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर बार्शी येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
बजरंग कोळेकर (रा. घाटनांदुर, ता. भूम) असे मारहाण झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. त्याने दिलेल्या माहितीनुसार, पवनचक्कीच्या कामाविरोधात तक्रारी केल्याचा राग मनात धरून काही गुंडांनी त्याला हॉकी स्टिकने तब्बल 22 मिनिटे मारहाण केली. यापूर्वी देखील कामाबद्दल तक्रार केल्याने त्याला 'बघून घेतो' अशी धमकी देण्यात आली होती, असेही त्याने सांगितले.
advertisement
घटनेची माहिती मिळताच भूम पोलिसांनी जखमी बजरंग कोळेकर यांची रुग्णालयात जाऊन पाहणी केली. पोलिसांनी त्यांची तक्रार नोंदवून घेतली असून, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती दिली आहे. पोलिसांनी घटनेमागील नेमकी वस्तुस्थिती जाणून घेतल्यानंतरच गुन्हा दाखल केला जाईल, असे स्पष्ट केले आहे. मारहाणीमुळे बजरंग कोळेकर गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.