धाराशिव : व्यवसायात रिस्क असतेच, झाला तर बक्कळ नफा किंवा डोकं वर काढता येणार नाही एवढा तोटा होऊ शकतो. परंतु दररोज विक्री होते अशा वस्तूंचा व्यवसाय केल्यास किमान दररोज नफ्याची शक्यता नाकारता येत नाही. असाच विचार करून धाराशिवच्या एका पठ्ठ्यानं केवळ 300 रुपयांची गुंतवणूक केली. आज एखाद्या मोठ्या कंपनीत जेवढा पगार मिळेल, तेवढंच त्याचं आर्थिक उत्पन्न आहे.
advertisement
धाराशिवच्या उमरगा शहरातील स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे चौक इथं गेल्या 26 वर्षांपासून इस्माइल अत्तार हे फुलांचा व्यवसाय करतात. सुरूवातीला त्यांनी केवळ 300 रुपयांची गुंतवणूक केली होती.
शिकून चांगल्या पगाराची नोकरी करावी हीच इस्माइल यांची इच्छा होती. मात्र घरची परिस्थती अत्यंत हलाखीची असल्यानं त्यांना बारावीनंतरचं शिक्षण घेता आलं नाही. त्यांनी व्यवसाय करायचं ठरवलं, मात्र मोठ्या व्यवसायासाठी मोठ्या भांडवलाची आवश्यकता होती. शेवटी त्यांनी एका सावकाराकडून 300 रुपये उधार घेऊन फुलं विकायला सुरूवात केली. फुलांना दररोज मागणी असते, त्यामुळे त्यातून रोज कमाई होईल, हाच विचार त्यांनी केला. 1998 साली त्यांचा हा व्यवसाय सुरू झाला. मग काय त्यांनी मागे वळून पाहिलं नाही.
अनेकजण सकाळ, संध्याकाळच्या पूजेसाठी फुलं आणि हार वापरतात. त्यामुळे या व्यवसायातून नफाही उत्तम होतो. आज इस्माईल यांचं दिवसाचं उत्पन्न आहे साधारण 2 हजार रुपये. म्हणजेच महिन्याला किमान 60 हजार रुपयांचं आर्थिक उत्पन्न कुठेच जात नाही. सणावाराच्या काळात यात आणखी वाढ होते. यातून त्यांचं कुटुंब अगदी सुखात जगतंय.