अर्चना पाटील यांची सारवासारव
कथित वक्तव्याबद्दल धाराशिव लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्याकडून स्पष्टीकरण देण्यात आलं. माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आला असून प्रसारित केलेली माझी प्रतिक्रिया तोडून-मोडून दाखवली गेल्याचा आरोपही अर्चना पाटील यांनी केला आहे. ज्या मतदारसंघात आमचे महायुतीचे सहकारी आमदार आहेत. तिथे वर्चस्व वाढवण्याबाबत मला प्रश्न विचारला होता. त्यावर ‘मी महायुतीची उमेदवार असताना आणि राजाभाऊसारखा भाऊ खंबीरपणे माझ्या पाठिशी असताना तिथे माझं वर्चस्व त्या मतदारसंघात का वाढवू? असं म्हणाले. माझ्या उत्तराला अर्धवट तोडून माझ्या बोलण्याचा विपर्यास केला गेला आणि चुकीच्या पद्धतीने ते मांडलं गेलं, असंही अर्चना पाटील यांनी स्पष्ट केलं. मी राष्ट्रवादीची आणि पर्यायाने महायुतीची उमेदवार आहे. आम्हाला पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करायचं असल्याचे पाटील यांनी सांगितले.
advertisement
अर्चना पाटील यांचं वक्तव्य काय होतं?
धाराशिव लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसने अर्चना पाटील यांना उमेदवारी जाहीर केली. बार्शीमध्ये प्रचारादरम्यान अर्चना पाटील यांनी हे वक्तव्य केलं आहे. ‘माझा नवरा भाजपचा आमदार आहे, तर राजेंद्र राऊतदेखील भाजप आमदार आहेत, त्यांचा मला भावासारखा पाठिंबा आहे, असं असताना मी कशासाठी राष्ट्रवादी काँग्रेस वाढवू, मी इथूनच विजयी होणार,’ असा विश्वास अर्चना पाटील यांनी व्यक्त केला आहे.
वाचा - 'कोल्हेंसाठी जीवाचं रान केलं, पण त्यांनी चहापण पाजला नाही'; राष्ट्रवादीच्या आमदाराची खदखद बाहेर
धाराशिव लोकसभेच्या उमेदवारीवरून महायुतीत मोठा खल झाला. यानंतर राष्ट्रवादीने अर्चना पाटील यांना पक्षात घेऊन उमेदवारी दिली. अर्चना पाटील या भाजप आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांच्या पत्नी आहेत. आता अर्चना पाटील यांनी राष्ट्रवादीबाबतच असं विधान केल्यामुळे राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते यावर काय प्रतिक्रिया देतात याकडे लक्ष लागलं आहे.