धाराशिव - धाराशिव जिल्ह्यातील सर्वात मोठे धरण म्हणून ओळख जाणारे सीना कोळेगाव या धरण क्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळे हे धरण 100 टक्के भरले आहे. तर परिसरातील काही गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. याठिकाणी सध्या नेमकी काय परिस्थिती आहे, याचबाबतचा हा आढावा.
सीना कोळेगाव धरणाची क्षमता ही पाच टीएमसीहून अधिक आहे. या धरणामुळे धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील व सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील क्षेत्र ओलिताखाली येते. सीना व तिच्या उपनद्यांवर असलेले हे धरण धाराशिव जिल्ह्यातील सर्वात मोठे धरण आहे. या धरणामुळे परंडा तालुका सुजलाम सुफलाम झाला आहे. तसेच परंडा तालुक्यातील बागायती क्षेत्रात वाढ झाली आहे. इतकेच नव्हे तर धरणामुळे हजारो हेक्टर वरील क्षेत्र ओलिताखाली आले आहे.
advertisement
सीना कोळगाव धरण हे 100% क्षमतेने भरले आहे. तर परिसरातील आवाटी, भोत्रा, रोसा, मुंगशी व सीना नदीकाठच्या गावातील सर्व गावकऱ्यांना सतर्कतेचा इशारा संबंधित विभागाकडून देण्यात आला आहे. सध्याची परिस्थिती पाहता, सीना कोळेगाव धरणामुळे 12 हजार हेक्टर क्षेत्र हे ओलिताखाली येणार आहे. त्यातील परंडा तालुक्यातील 8 हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. तर उर्वरित करमाळा तालुक्यातील क्षेत्र ओलिताखाली आले आहे.
100 टक्के धरण भरल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदी वातावरण पाहायला मिळत आहे. हे धरण 100% क्षमतेने भरल्यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरणाचे काही दरवाजे उघडण्यात आले आहेत तर नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आले आहे.