धाराशिव तुळजाभवानी देवीचे दर्शन काही काळ बंद ठेवण्याचा निर्णय मंदिर संस्थांनने घेतला आहे. तुळजभवानी मंदिरात सध्या जीर्णोद्धाराचे काम सुरू असून, पुरातत्त्व खात्यामार्फत देवीच्या सिंहाच्या गाभाऱ्यात दिनांक १ ऑगस्टपासून काम सुरू झाले आहे. सुरुवातीला मंदिर संस्थांनने हे काम १० ऑगस्टपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता वर्तवली होती. त्यामुळे १० ऑगस्ट पर्यंत धर्मदर्शन आणि पेड दर्शन बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता हे काम २० ऑगस्टपर्यंत चालणार असून, त्यामुळे दिनांक २० ऑगस्टपर्यंत श्री मंदिर भाविकांसाठी धर्मदर्शन तसेच पेड दर्शन बंद असणार आहेत.
advertisement
या काळात मुखदर्शन, सिंहासन पूजा, अभिषेक पूजा व इतर धार्मिक विधी मात्र नियमितपणे चालू राहणार आहेत. याबाबत सर्व महंत, पुजारी, सेवेकरी व भाविकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन मंदिर संस्थांनतर्फे करण्यात आले आहे.
दुग्धशर्करा! श्रावणात अंगारकी संकष्टीचा योगायोग; वर्षभर संकष्टी करण्यात इतकं फळ
तुळजाभवानी मंदिर हे महाराष्ट्रातील धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर शहरात असलेले एक महत्त्वाचे शक्तिपीठ आहे. महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून ही देवी ओळखली जाते. या मंदिराला धार्मिक तसेच ऐतिहासिकदृष्ट्या मोठे महत्त्व आहे. तुळजाभवानी ही छत्रपती शिवाजी महाराजांची कुलदेवता होती. असे मानले जाते की, देवीने स्वतः महाराजांना भवानी तलवार दिली होती, ज्यामुळे त्यांना हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यासाठी प्रेरणा आणि शक्ती मिळाली. हे मंदिर बालाघाटच्या एका डोंगरावर वसलेले आहे. मंदिराची काही रचना हेमाडपंती शैलीत केलेली आहे, जी प्राचीन स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना आहे.
