लातूर जिल्ह्याच्या उदगीर शहरातील आझादनगर भागात राहणाऱ्या 41 वर्षीय महिला दायमी कौसर फातिमा या कोविड पॉझिटिव्ह आल्या. त्यामुळे उदगीर शहरातील नांदेड नाका परिसरातील ओसवाल बिल्डिंग येथील कोविड सेंटर मध्ये दाखल करण्यात आले. तिथे त्यांच्यावर डॉ. शशिकांत डांगे आणि त्यांचे सहकारी योग्य ते उपचार देत होते. ऑक्सिजनही प्रमाणापेक्षा जास्त लागत होता. उपचार सुरु असताना अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. शशिकांत देशपांडे यांनी डॉ. शशिकांत डांगे यांना फोन केला. दोघांनी काही वेळा कामाचे संभाषण केलं. ज्यावेळेस ऑक्सिजनचा विषय निघाला तेव्हा कोविड रुग्णावर जातीवाचक बोलत 'ऑक्सिजन जास्त जात असेल तर मारून टाक, तुला पण जास्त पुळका, जाऊ दे की मरू दे एखाद्याचे पुण्य घे ना' असे धक्कादायक वक्तव्य डॉ. शशिकांत देशपांडे यांनी डॉ. शशिकांत डांगे यांना बोलताना केलं आहे.
advertisement
डॉ. शशिकांत देशपांडे आणि डॉ. शशिकांत डांगे यांच्यातील ऑडिओ संवाद
दोन्ही डॉक्टरांमधील संवाद स्पिकर फोन चालू असल्यामुळे रुग्णाचे पती अझिमोद्दीन गौसुद्दीन दायमी यांनी ऐकला. मात्र आपल्या पत्नीची प्रकृती गंभीर असल्याने त्यावेळी त्यांनी ते ऐकून घेत नजरअंदाज केले. पुढे डॉ. डांगे आणि सहकाऱ्यांनी योग्य ते उपचार करून कौसर फातिमा दायमी यांना बरे ही केले. मात्र गेल्या काही दिवसांपासून ही क्लिप सोशल मीडियातून व्हायरल होत आहे. त्यामुळे जातीवाचक उल्लेख करून धार्मिक भावना दुखावल्याने अजिमोद्दीन गौसुद्दीन दायमी यांनी उदगीर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरून तक्रारींवरून उदगीर शहर पोलीस ठाण्यात डॉ. शशिकांत देशपांडे यांच्याविरोधात जीवे मारण्यासाठी चिथावनी आणि धार्मिक भावना दुखावल्यावरून गुन्हा दाखल केलाय. यात डॉक्टरचा मोबाईलही पोलिसांनी जप्त केलाय.
राक्षसी मनोवृत्तीचा डॉक्टर पुढे
जातीच्या-धर्माच्या नजरेतून रुग्णाला पाहणारा आणि ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून समाजापुढे आलेला डॉ. शशिकांत देशपांडे हा बहुधा पहिलाच असावा. देवदूत म्हणून कोविड काळात डॉक्टरांनी हजारो रुग्णांचे प्राण वाचविले. त्यात एका राक्षसी मनोवृत्तीचा डॉक्टर पुढे आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.