मार्च महिन्यातच पैठण तालुक्यातील डोनगाव तांबे येथे पाणी टंचाई जाणवू लागली आहे. मराठवाडा हा सतत दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो. परंतु याच मराठवाड्याला नाथसागर धरणातून पाणीपुरवठा केला जातो. या धरणातून मराठवाड्याची तहान भागवली जाते. मात्र "धरण उशाला आणि कोरड घशाला" असे म्हणायची वेळ याच पैठण तालुक्यातील डोणगाव तांबे नागरिकांवरती आल्याची दिसते.
advertisement
पाणी टंचाईचा परिणाम लग्नावर...
पैठण तालुक्यातील डोणगाव तांबे या गावात भीषण पाणी टंचाईचा सामना तांड्यावरील आणि गावातील नागरिकांना करावा लागत आहे. गावात पाणी नसल्यामुळे इतर गावातील नागरिक आपल्या मुलींचे लग्न या गावातील मुलांशी लावत नसल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी बोलताना दिली आहे. यावर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झाला असला तरी देखील पैठण तालुक्यातील डोणगाव तांबे गावात भीषण पाणीटंचाई भेडसावत आहे. अक्षरशः महिलांना एक ते दोन किलोमीटर अंतरावरून पाणी आणण्याची वेळ आली आहे.
पिण्याच्या पाण्यासाठी देखील भटकंती करावी लागत आहे. गावामध्ये तब्बल एक ते दीड महिना पाणी सुटत नसल्याने चक्क पाणी आणण्यासाठी शाळकरी मुलांनाही आता डोक्यावरती हंडा घेण्याची वेळ या विद्यार्थ्यांवरती आली आहे. आम्हाला शाळा सोडून पाणी आणण्यासाठी घरी राहवावे लागते. याचाच फटका आमच्या अभ्यासावर होत आहे, असे विद्यार्थ्यांनी म्हटले. यंदाच्या पावसाळ्यात डोणगाव तांबे येथील पाझर तलाव भरला होता. परंतु मार्च महिन्यात तलाव कोरडा ठाक पडला असून पाणीपातळी खोल गेल्याने विहिरीसह बोअरवेल कोरडे होऊन पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
