एसटी प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर मध्यवर्ती बसस्थानकात नव्या 12 मीटरच्या 5 ई-बस दाखल झाल्या आहेत. या बस छत्रपती संभाजीनगर ते पुणे मार्गावर धावणार आहेत. सोमवारी (1 सप्टेंबर) सकाळी 10 वाजता विभाग नियंत्रक सचिन क्षीरसागर आणि ज्येष्ठ प्रवासी जोडप्यांच्या हस्ते पूजा करून प्रवाशांच्या सेवेत एक बस सोडण्यात आली. शहरातून पुण्यासाठी आता दर अर्ध्या तासाला ई-बस धावणार आहेत. सध्या एकूण 46 ई- बस आगारात आहेत.
advertisement
छत्रपती संभाजीनगर विभागातील विविध मार्गावर सुमारे 41 ई-बस सेवा देत होत्या. यामध्ये 9 मीटरच्या 25 बस, 12 मीटरच्या 11 बस, ई-शिवाई 5 अशा एकूण 41 ई-बसचा समावेश आहे. त्यात आता नवीन 5 ई-बसची भर पडली आहे. या बस सोमवारी सकाळी मध्यवर्ती बसस्थानकातून पुणे मार्गावर सोडण्यात आल्या. यावेळी नवीन बसची पूजा करून बसमधील प्रवाशांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं.
विभाग नियंत्रक सचिन क्षीरसागर यांनी प्रवाशांसह चालक-वाहकांना शुभेच्छा दिल्या. यावेळी यंत्र अभियंता सुरेंद्र तांदळे, उपयंत्र अभियंता स्वाती पाटील, आगार व्यवस्थापक अजय पाटील, स्थानकप्रमुख संतोष नजन, वाहतूक निरीक्षक ललित शहा, कामगार संघटनेचे विभागीय सचिव बाबासाहेब साळुंके, धनश्याम म्हस्के, दीपक बागलाने, सय्यद नजीब आदींची उपस्थिती होती. ई-बसच्या सुविधेमुळे छत्रपती संभाजीनगर ते पुणे प्रवास आरामदायी आणि जलद होणार आहे.