महायुतीचं ठरलं...
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्यात जवळपास ५ तास बैठक झाली. या बैठकीत शिंदे गटाचे नेतेही उपस्थित होते. या बैठकीत महायुतीतील जागावाटपाचा बहुचर्चित फॉर्म्युला अखेर निश्चित झाला आहे. त्याची अधिकृत घोषणा लवकरच होणार आहे. मुंबई महानगर क्षेत्रातील महत्त्वाच्या महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि भाजपमधील जागावाटपाचा निर्णय अंतिम टप्प्यात पोहोचला आहे.
advertisement
शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्यात सुमारे पाच तासांची मॅरेथॉन चर्चा झाली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे येथील निवासस्थानी ही बैठक पार पडली. पहाटे चार वाजेपर्यंत सविस्तर विचारमंथन सुरू होते.
बैठकीत तोडगा, पुढं काय?
या बैठकीत मुंबई महानगर क्षेत्रातील ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, मीरा-भाईंदर आणि वसई-विरार महापालिकांमधील शिवसेना-भाजप युतीच्या जागावाटपावर शिक्कामोर्तब करण्यात आले. दोन्ही पक्षांमध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला ठरल्याने महायुतीतील समन्वय अधिक मजबूत झाल्याचे चित्र आहे.
येत्या दोन दिवसांत स्थानिक पातळीवर वॉर्ड आणि प्रभागस्तरावरील उमेदवारांबाबत चर्चा होणार असून, त्यानंतर अंतिम यादी जाहीर केली जाण्याची शक्यता आहे.
या महत्त्वपूर्ण बैठकीला शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार नरेश म्हस्के तसेच सरचिटणीस राहुल शेवाळे उपस्थित होते. राजकीय चर्चेपलीकडे अनेक विषयांवर हास्यविनोद करत अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात चर्चा पार पडली असल्याचे सांगण्यात येत आहे.
पीएम मोदी यांच्या कार्यकौशल्याबाबतही चर्चा...
दरम्यान, बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील कार्यकौशल्य आणि कर्तृत्वाबाबतही सविस्तर चर्चा झाली. उपस्थित प्रत्येकाने मोदीजींसोबतचे वैयक्तिक अनुभव शेअर करत त्यांच्या नेतृत्वाचे कौतुक केले. महायुतीच्या आगामी निवडणूक रणनितीच्या दृष्टीने ही बैठक अत्यंत महत्त्वाची ठरल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
