शिवसेना आणि भाजप हे मुंबई महानगरपालिकेत महायुती एकत्र निवडणूक लढले असून मुंबईत महायुतीचा महापौर होईल असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. शिवसेनेचा महापौर होईल का असे विचारले असता, त्यांनी महायुतीचा महापौर होईल, असा पुनरुच्चार केला. भाजपचा महापौर होईल असे म्हणणे त्यांनी टाळले. यातूनच शिवसेना महापौरपदासाठी आग्रही असल्याचे संकेत मिळत आहेत.
advertisement
महापौरपदासाठी अडीच अडीच वर्षांचा फॉर्म्युला?
ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर यासह महायुती म्हणून जिथे जिथे एकत्र निवडणूक लढलो त्याठिकाणी महायुतीचाच महापौर बनवण्यात येईल असे त्यांनी सांगितले. अडीच अडीच वर्षांच्या फॉर्म्युल्यावर विचारले असता, तुम्हीच प्रश्न विचारताय, तुम्हीच उत्तरे देताय, असे म्हणत त्यांनी वेळ मारून नेली.
महायुती म्हणून सेना-भाजपला मतदान केले
मुंबईमध्ये महानगरपालिका निवडणूकध्ये कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नसल्याने, आणि शिवसेनेने आपले नगरसेवक पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवल्याने याबाबत अनेक तर्क वितर्क लावण्यात येत होते. मात्र या सर्व शंकाकुशंकांना पूर्णविराम देत मुंबईत महायुतीचाच महापौर होईल असे शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. मुंबईकर नागरिकांनी मोठ्या विश्वासाने महायुती म्हणून सेना - भाजपला मतदान केले असून त्यांच्या मतांशी प्रतारणा करून कोणताही वेगळा निर्णय शिवसेना घेणार नाही. मुंबईकरांनी याबाबत कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असेही ते म्हणाले.
त्या चर्चांमध्ये अजिबात तथ्य नाही
यासोबतच ज्या ज्या मनपामध्ये शिवसेना भाजप हे महायुती म्हणून एकत्र निवडणूक लढले आहेत तिथेही महायुतीचाच महापौर बसविण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे मुंबईसह महाराष्ट्रात अन्य काही राजकीय समीकरणे तयार होत असल्याबद्दल सुरू असलेल्या चर्चांमध्ये अजिबात तथ्य नसून मुंबईत शिवसेना भाजप रिपाइं महायुतीचा महापौर होईल असे त्यांनी सांगितले.
