राज्य सरकार 2100 रुपये कधी देणार याकडं राज्यभरातील लाडक्या बहिणींचं लक्ष लागून राहिलं आहे. विरोधकांनी लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा हफ्ता आणि या योजनेतील अपात्र लाभार्थ्यांचा मुद्दा अधिवेशनात उपस्थित करुन सत्ताधाऱ्यांना खिंडीत गाठलं.
विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी महायुतीच्या नेत्यांनी लाडक्या बहिणींना दरमहा २१०० रुपये देण्याचं आश्वासन दिलं होतं. पण फडणवीस सरकारला सत्तेत येऊन वर्ष उलटून गेलं तरी लाडक्या बहिणींना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता काही सरकारनं केली नाही. त्यावरून विधानसभेत विरोधकांनी कोंडी केल्यानंतर लवकरच योग्य वेळी २१०० रुपये देऊ, असे सत्ताधाऱ्यांनी आश्वासन दिलं. खरं तर विरोधकांनी लाडकी बहीण योजनेचा अपात्र लाभार्थ्यांनी लाभ घेतल्याचा मुद्दा उपस्थित केला होता
advertisement
लाडकी बहीण योजनेत घुसखोरी
26 लाख अपात्र महिलांनी घेतला योजनेचा लाभ घेतल्याचं समोर आलंय, 14 हजार 297 पुरुषांनी घेतला योजनेचा लाभ घेतला.
9 हजार 526 सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी या योजनेचा लाभ उकळल्याची माहिती समोर आलीय.
याच मुद्यावरून विरोधकांनी सरकारवर प्रश्नांच्या फैरी डागल्यात. तर विरोधकांच्या या सवालांना राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरेंनी उत्तर दिलंय. तसेच ज्या सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतलाय, त्यांच्याकडून ही रक्कम वसूल केली जाणार असल्याची माहितीही आदिती तटकरेंनी दिलीय.
लाडकी बहीण योजनेवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी झाली असली तरी सरसकटपणे या योजनेचा लाभ दिल्यामुळे सरकारला मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागला. त्याचा राज्याच्या तिजोरीवरही भार पडला. एकीकडे सरकार या योजनेवरून पाठ थोपटून घेत असतानाच या योजनेत झालेल्या घुसखोरी रोखण्यासाठी सरकारने आता सुरू केलेले प्रयत्न म्हणजे बैल गेला आणि झोपा केला असंच म्हणावं लागेल.
