'तू आम्हाला ड्रॉप केलं...', 3 भारतीय क्रिकेटपटूंचा कोचवर जीवघेणा हल्ला, डोक्याला 20 टाके, खांदाही तुटला!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
टीममध्ये निवड झाली नाही म्हणून तीन भारतीय क्रिकेटपटूंनी कोचवर जीवघेणा हल्ला केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या हल्ल्यात कोचच्या डोक्याला 20 टाके पडले आहेत.
मुंबई : सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीसाठी टीममध्ये निवड झाली नाही म्हणून भारतातल्या तीन क्रिकेटपटूंनी थेट कोचवरच जीवघेणा हल्ला केला आहे. या हल्ल्यात कोच गंभीर जखमी झाला असून त्याच्या डोक्याला 20 टाके पडले आहेत, तसंच त्याचा खांदाही तुटला आहे. पुदुच्चेरी क्रिकेट असोसिएशनचे प्रशिक्षक एस व्यंकटरमन यांच्यावर असोसिएशनच्या प्रशिक्षण केंद्राच्या आत 3 क्रिकेटपटूंनी हा हल्ला केला आहे. सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास इनडोअर नेट प्रॅक्टिसदरम्यान ही घटना घडली आहे.
याप्रकरणी सेदारपेट पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्यंकटरमन हल्ल्यात गंभीर जखमी झाले असून आरोपी खेळाडू फरार आहेत, त्यांना शोधण्याचं काम सुरू आहे, अशी प्रतिक्रिया सब इन्सपेक्टर एस राजेश यांनी दिली आहे. तक्रारीमध्ये व्यंकटरमन यांनी कार्तिकेयन जयसुंदरम, ए अरविंदराज आणि एस संतोष कुमारन यांनी हल्ला केल्याचा आरोप केला आहे. तसंच या तिघांनी भारतीदासन पुदुच्चेरी क्रिकेटर्स फोरमचे सचिव जी चंद्रन यांच्या आदेशानुसार हा हल्ला झाल्याचा आरोपही व्यंकटरमन यांनी केला आहे.
advertisement
थोडक्यात वाचले कोच
8 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास मी सीएपी भागामध्ये इनडोअर नेट घेत होतो, तेव्हा पुदुच्चेरीचे क्रिकेटपटू कार्तिकेयन, अरविंदराज आणि संतोष कुमारन आले आणि त्यांनी मला शिव्या द्यायला सुरूवात केली. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीसाठी त्यांची निवड न व्हायला मी जबाबदार आहे, असं त्यांना वाटत होतं. अरविंदराजने मला पकडलं आणि कार्तिकेयनने संतोष कुमारनची बॅट खेचून घेतली, यानंतर त्याने मला जीवे मारण्याची धमकी दिली. तसंच आम्ही तुला मारू तेव्हाच आम्हाला संधी मिळेल, असं चंद्रन आम्हाला म्हणाला आहे, असं ते माझ्यावर हल्ला करताना म्हणत होते, असं व्यंकटरमन यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितलं आहे.
advertisement
भारतीदासन फोरमने या आरोपांचं खंडन केलं आहे. तसंच व्यंकटरमन यांचे स्थानिक क्रिकेटपटूंसोबत आधीच वाद होते, त्यामुळे त्यांच्यावर हल्ला झाल्याचा दावा फोरमने केला आहे. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये पुदुच्चेरीने एलीट ग्रुप सी मध्ये बडोदा, बंगाल आणि हरियाणा अशा दिग्गज टीमचा पराभव केला आहे. 7 सामन्यांमध्ये 4 विजय मिळवूनही पुदुच्चेरीला सुपर लीगमध्ये क्वालिफाय होता आलं नाही. 12 डिसेंबरपासून सुपर लीगला सुरूवात होणार आहेत.
advertisement
पुदुच्चेरी क्रिकेट असोसिएशनवर आरोप
दरम्यान पुदुच्चेरी क्रिकेट असोसिएशनवर बाहेरच्या क्रिकेटपटूंना बोगस शिक्षण प्रमाणपत्र आणि आधार कार्डच्या आधारे टीममध्ये संधी दिली जात असल्याचा आरोप होत आहे. 2021 पासून आतापर्यंत पुदुच्चेरीच्या फक्त 5 स्थानिक खेळाडूंनी रणजी ट्रॉफी खेळली आहे, असं तपासात उघड झालं आहे. हा रिपोर्ट समोर आल्यानंतर बीसीसीआयदेखील प्रकरणाची चौकशी करणार असल्याचं बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी स्पष्ट केलं आहे. पुदुच्चेरी क्रिकेटवर आरोप होत असतानाच कोचवर गंभीर हल्ला झाल्यामुळे खळबळ माजली आहे.
view commentsLocation :
Puducherry (Pondicherry)
First Published :
December 10, 2025 5:01 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
'तू आम्हाला ड्रॉप केलं...', 3 भारतीय क्रिकेटपटूंचा कोचवर जीवघेणा हल्ला, डोक्याला 20 टाके, खांदाही तुटला!










