मुंबई महानगरपालिकेच्या निकालानंतर गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय हालचालींना अखेर वेग आला आहे. दिल्लीत मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम आणि शिंदे गटाचे नेते राहुल शेवाळे यांच्यात चर्चा झाल्याचे वृत्त आहे. मात्र, इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, मंगळवारी रात्री एकनाथ शिंदे हे देखील दिल्लीत होते. दिल्लीतील बैठकीत महापौर आणि इतर समितीबाबत चर्चा केली असल्याचे म्हटले जात आहे. कोणालाही न सांगता अचानकपणे शिंदे यांचा हा दिल्ली दौरा झाल्याने शिवसेना शिंदे गट अजूनही आपल्या मागण्यांवर ठाम असल्याचे म्हटले जात आहे..
advertisement
बीएमसीच्या २२७ जागांच्या रिंगणात भाजप ८९ जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. मात्र, बहुमतासाठी आवश्यक असलेला ११४ चा आकडा गाठण्यासाठी त्यांना शिंदे यांच्या २९ नगरसेवकांची साथ अनिवार्य आहे. या युतीचे एकूण संख्याबळ ११८ वर पोहोचले असून, बहुमताचा आकडा त्यांनी सहज पार केला आहे.
शिंदे-भाजप दिल्लीत सक्रिय, सत्तेच्या फॉर्म्युल्यावर चर्चा
निवडून आलेल्या मुंबईतील नगरसेवकांना मुंबईतील हॉटेलमध्ये तीन दिवसांसाठी ठेवण्यात आले होते. त्यांच्याकडील निवडणूक आयोगाने दिलेले विजयी होण्याच्या प्रमाणपत्राची मूळ प्रत शिंदे गटाने आपल्याकडे ठेवली आहे. या नगरसेवकांना आपल्या घरी जाण्याची परवानगी देण्यात आली. त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने दिल्ली गाठून भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाची भेट घेतली असल्याचे सांगण्यात येते.
मुंबईच्या महापौरपदाबाबत आणि इतर महापालिकांमधील सत्तावाटपाबाबत या बैठकीत खलबते झाल्याचे समजते. केवळ मुंबईच नव्हे, तर ठाणे, कल्याण-डोंबिवली या महापालिकांमध्येही युतीचा सत्तेचा फॉर्म्युला काय असेल, यावर चर्चा सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.
