बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्याची मुदत मंगळवारी २९ सप्टेंबर रोजी संपत आहे. परंतु पाऊस आणि पूर परिस्थितीमुळे मराठवाड्यातील हजारो १२ वी च्या विद्यार्थ्यांनी परीक्षेचा अर्ज भरलेला नाही. अर्ज भरण्याचा उद्याचा एकच दिवस बाकी असल्याने एवढ्या जणांचे अर्ज भरणे शक्य नसल्याने मुदतवाढीची मागणी केली जात होती.
पूरग्रस्त भागातील हजारो विद्यार्थ्यांच्या मागणीनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बारावीचे अर्ज भरण्याला मुदतवाढ दिल्याची घोषणा केली आहे. राज्याचे शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांना त्यासंदर्भातील सूचना देण्यात येतील, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. ते 'एबीपी माझा' वृत्तवाहिनीशी बोलत होते.
advertisement
अर्ज स्वीकारण्याची मुदत २० ऑक्टोबर पर्यंत वाढविण्यात आली
उपमुख्यमंत्री शिंदे यांनी शिक्षण मंत्री भुसे यांना बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा देण्याबाबत निर्णय घेण्यास सांगितले. शिक्षण मंत्र्यांनी लगेचच राज्य परीक्षा मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांच्याशी संपर्क केला आणि अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्याचे निर्देशही दिले. त्यानुसार शिक्षण विभागामार्फत २० ऑक्टोबर पर्यंत अर्ज भरण्यासाठी मुदतवाढीचा निर्णय घेण्यात आला. यासंदर्भात शिक्षण विभागामार्फत परिपत्रक जारी करण्याची प्रक्रिया करण्यात आली. त्याचबरोबर बाह्य पद्धतीने परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी देखील अर्ज भरण्याची मुदत १५ ऑक्टोबर पर्यंत वाढविण्यात आली आहे. तसेच नवीन परीक्षा केंद्रासाठी अर्ज स्वीकारण्याची मुदत १० ऑक्टोबर पर्यंत वाढविण्यात आली आहे.
मराठवाड्यावर मोठे संकट
महाराष्ट्रात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या आपत्तीमध्ये केवळ पिकांचेच नुकसान झाले नाही तर जनावरेदेखील मोठ्या प्रमाणावर दगावली आहेत. या अभूतपूर्व संकटाची व्याप्ती खूप मोठी आहे. अतिवृष्टीने केवळ शेतकरी वर्ग बाधित झाला नसून त्याची मोठी झळ गावातील लहान मोठे व्यावसायिक, कारागीर आणि शेतमजुरांना देखील बसली आहे. एकंदरीत गावांमधील बारा बलुतेदार, मागासवर्गीय समुदायावर देखील हे अरिष्ट कोसळले आहे.