नाशिक महानगरपालिकेचे अधिकारी जर काम करत नसतील, तर शहराला खड्ड्यात घालणाऱ्या अधिकाऱ्याला निलंबित केल्याशिवाय राहणार नाही, असा कठोर इशारा शिंदे यांनी दिला. पगार कसला घेतात? सेवा देण्याचा ना! जो अधिकारी आणि कर्मचारी काम करेल त्याचा सन्मान केला जाईल, मात्र नागरिकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्यांना सोडणार नाही, अशा शब्दांत त्यांनी प्रशासनाला तंबी दिली.
advertisement
खड्डेमुक्त नाशिक केल्याशिवाय थांबणार नाही : एकनाथ शिंदे
विकास, विचार आणि विश्वास ही त्रिसूत्री मांडत नागरिकांना दिलेल्या आश्वासनांवर ठाम असल्याचे शिंदे यांनी सांगितले.महापालिका माझ्या अंडर येतात, त्यामुळे खड्डेमुक्त नाशिक केल्याशिवाय मी थांबणार नाही,असा ठाम निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
अलीकडेच न्यूज 18 लोकमतने नाशिकमधील खड्ड्यांचे भीषण वास्तव दाखवले होते. पावसाळ्यानंतर शहरातील रस्त्यांची दुर्दशा, खड्ड्यांमुळे होणारे अपघात आणि नागरिकांची होणारी गैरसोय याकडे त्यांनी लक्ष वेधले होते. त्याच पार्श्वभूमीवर शिंदे यांनी अधिकाऱ्यांना फटकारले. महापालिका अधिकाऱ्यांची मनमानी चालणार नाही. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी व सोयीसाठी प्रशासनाने जबाबदारीने काम केले पाहिजे. खड्डेमुक्त नाशिक हेच आपले लक्ष्य आहे, असे शिंदे म्हणाले.
महापालिका प्रशासन काय पावले उचलणार?
त्यांच्या या वक्तव्यामुळे नाशिकमधील रस्त्यांच्या दुरुस्तीबाबत आता महापालिका प्रशासन किती गंभीर पावले उचलते, याकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे. खड्डेमुक्त नाशिकचे आश्वासन कितपत पूर्ण होते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.