मुंबई महापालिकेसाठी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीची आघाडी जाहीर झाली असून, दुसरीकडे शरदचंद्र पवार पक्षाची राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटात आघाडीची चर्चा सुरू आहे. भाजप आणि शिवसेना शिंदे गटात जागा वाटपाची चर्चा सुरू असून आज रात्री उशिरा शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. भाजपसोबत जागा वाटपाची चर्चा सुरू असताना दुसरीकडे एकनाथ शिंदे यांना मोठा निर्णय घेतला आहे. एकनाथ शिंदे यांनी आपल्या ६० उमेदवारांना तयार राहण्याचे आदेश दिले आहेत.
advertisement
मुंबई महापालिकेसाठी शिंदे गटाचे उमेदवार कोण?
भाजपसोबत चर्चा सुरू असताना आता दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली ताकद दाखवण्यास सुरुवात केली आहे. शिवसेना ठाकरे गटातून तसेच इतर पक्षांतून शिंदे गटात आलेल्या तब्बल ६० माजी नगरसेवकांना आज त्यांनी बैठकीसाठी बोलावले आहे. यामध्ये २०१७ साली निवडून आलेले ३९ नगरसेवक आणि इतर पक्षांतील २१ माजी नगरसेवकांचा समावेश आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, या सर्व ६० माजी नगरसेवकांचे तिकीट एकनाथ शिंदे यांनी जवळपास निश्चित केले आहे. आज 'नंदनवन' या निवासस्थानी होणाऱ्या बैठकीत शिंदे स्वतः या नगरसेवकांना ‘कानमंत्र’ देणार आहेत. या माजी नगरसेवकांना नंदनवन येथे उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या बैठकीत निवडणूक रणनीतीसह काही उमेदवारांना थेट एबी फॉर्मही वाटप होण्याची शक्यता आहे.
विशेष म्हणजे, या बैठकीसाठी नगरसेवकांना उमेदवारीशी संबंधित सर्व कागदपत्रे सोबत आणण्यास सांगण्यात आले आहे. त्यामुळे शिंदे गटाकडून उमेदवारांवर आजच शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
