मागील काही दिवसांपासून कल्याण-डोंबिवलीमधील राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला होता. ठाकरे गटाचे चार नगरसेवक नॉट रिचेबल झाले होते. त्यानंतर आज मोठी घडामोड ठरली. नवी मुंबईत कोकण भवन येथे नगरसेवकांच्या गटाची नोंदणी करण्यासाठी आलेल्या शिवसेना शिंदे गटाने आपली मोठी खेळी खेळली. कल्याण डोंबिंवलीमध्ये शिवसेना-मनसेचा महापौर होणार असल्याचा दावा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केला.
advertisement
शिवसेना शिंदे गटाने कोकण आयुक्ताकडे महापालिकेतील सत्ता स्थापनेचा दावा केला. शिवसेना शिंदे गटाकडे ५३, ठाकरे बंडखोर-४ आणि मनसे ५ असे संख्याबळ आहे. ठाकरेंच्या ४ बंडखोरांपैकी दोनजण हे मनसेचे होते. त्यांनी ठाकरे गटाच्या निवडणूक चिन्हावर निवडणूक लढवली. तर, दोन जण हे शिंदे गटातून उमेदवारी न मिळाल्याने ठाकरे गटातून निवडणूक लढवून विजयी झाले होते.
कल्याण-डोंबिवली महापालिकेमध्ये शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांनी युती केली होती. भाजपचे ५० उमेदवार विजयी झाले होते. त्यानंतर भाजपकडून अडीच-अडीच वर्षासाठीच्या महापौर पदाची मागणी करण्यात आली होती. आता मनसेला सोबत घेत शिंदे गटाने बहुमताचा आकडा गाठला. त्यामुळे भाजपला धक्का बसला असून सत्तेपासून दूर राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
