मतदारयादीच्या मुद्यावरुन राज्यात विरोधकांनी 1 नोव्हेंबर रोजी मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. तर, विरोधकांकडून पराभवाआधीच कांगावा केला जात असल्याची टीका महायुतीने केली आहे. मात्र, महायुतीच्या नेत्यांकडून विरोधकांच्या आरोपांना बळ देणारी वक्तव्ये केली जात आहे.
ठाणे जिल्ह्यातील बदलापूरमधील शिवसेना शिंदे गटाचे नेते वामन म्हात्रे यांनीही बदलापुरात 19 हजार मतदार बाहेरचे असल्याचा आरोप केला आहे. बदलापूर शहर सध्या मुरबाड मतदारसंघात येत असून भाजपचे किसन कथोरे हे आमदार आहेत.
advertisement
वामन म्हात्रे यांनी पत्रकार परिषद घेत मतदारयादीवरून जोरदार टीकास्त्र सोडले. म्हात्रे यांनी म्हटले की, कुळगाव-बदलापूर नगरपालिका निवडणुकीच्या मतदारयादीत 19 हजार दुबार मतदार आहेत. हे मतदार शहराबाहेरील असल्याचा आरोप त्यांनी केला. शहराबाहेरचे मतदार नगरपालिकेसाठी मतदान करण्यास आल्यास त्यांना थेट मतदान केंद्रावर चोप देऊ असा इशारा दिला. बदलापूरमध्ये प्रत्येक प्रभागात एकाच नावाच्या अनेक मतदारांची नोंदणी करण्यात आली असून दुबार मतदारांची संख्या मोठी असल्याचा आरोप केला. तर, बदलापूर शहरालगतच्या ग्रामीण भागातील तब्बल 17 हजार मतदारांची नावं बदलापूर शहराच्या मतदार यादीत टाकण्यात आली आहेत. खोटे डॉक्युमेंट देऊन या मतदारांची नावं बदलापूर शहराच्या यादीत टाकण्यात आली असून याबाबत निवडणूक आयोगाला तक्रार करण्यात आली असल्याचे म्हात्रे यांनी सांगितले.
कुळगाव-बदलापूर नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी तयार केली जाणारी मतदार यादी गंभीर वादाला तोंड देत आहे. सध्या वापरल्या जाणाऱ्या यादीचा आधार हा विधानसभा मतदारसंघनिहाय असल्याने अनेक चुकीची नावे समाविष्ट झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. शहरातील निवडणूक प्रभागांमध्ये अंबरनाथ तालुक्यातील परिसर, चोन, कर्जत, बारवी धरण क्षेत्र, मलंगगड, कल्याण आणि शहापूर भागातील नागरिकांची नावे बदलापूरच्या मतदारयादीत समाविष्ट करण्यात आली आहेत, अशी धक्कादायक माहिती म्हात्रे यांनी दिली.
याचबरोबर, बदलापूर शहरातील काही प्रतिष्ठित व्यक्ती तसेच विविध संस्थांशी संबंधित नागरिकांनी आपली नावे वेगवेगळ्या प्रभागांमध्ये नोंदवली असल्याचा आरोप शिवसेनेचे माजी गटनेते श्रीधर पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला.