राहुल खंदारे, प्रतिनिधी, बुलढाणा: मतदारयादीच्या घोळावरून विरोधी बाकांवरील पक्ष चांगलेच आक्रमक झाले आहेत. विरोधकांकडून व्होट चोरीचा आरोप होत असताना सदोष मतदारयादीचा मुद्दा विरोधकांकडून उपस्थित करण्यात येत आहे. मागील दोन दिवस महाविकास आघाडी, मनसे आणि डाव्या पक्षांच्या नेत्यांनी राज्य निवडणूक अधिकाऱ्यांसोबत बैठक केली. तर, दुसरीकडे यावर महायुतीकडून खिल्ली उडवण्यात आली. आता मात्र, शिंदे गटाच्या आमदाराने विरोधकांच्या सुरात सूर मिळवला आहे.
advertisement
आगामी नगरपालिका निवडणुका तोंडावर असताना बुलढाणा शहरात मतदार याद्यांमध्ये मोठा गोंधळ उघडकीस आला आहे. तब्बल चार हजार मतदारांची नावे दोन वेगवेगळ्या प्रभागांमध्ये असल्याचा गंभीर आरोप सत्ताधारी आमदार संजय गायकवाड यांनी केला आहे. या प्रकरणी त्यांनी निवडणूक आयोगावर तीव्र शब्दांत टीका करत, “आयोगाने जटिल निर्णय घेण्यापेक्षा मूलभूत त्रुटींवर लक्ष द्यावे,” अशी मागणी केली आहे.
आमदार गायकवाड यांनी या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना लेखी निवेदन देत मतदार याद्यांची तात्काळ दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, केवळ बुलढाणा शहरातच हजारो मतदारांची नावे दोन ठिकाणी असून, अनेक मृत मतदारांची नावेही अद्याप यादीत कायम आहेत. अशा परिस्थितीत निवडणुका पारदर्शक आणि निष्पक्ष होण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. “निवडणूक आयोगाने मतदार याद्या अद्ययावत करण्याऐवजी अनावश्यक आणि गुंतागुंतीचे निर्णय घेतले आहेत. आयोगाने या गंभीर त्रुटीकडे तात्काळ लक्ष देऊन कारवाई करावी,” अशी मागणी संजय गायकवाड यांनी केली.
विशेष म्हणजे, सत्ताधारी आमदारानेच निवडणूक आयोगावर ताशेरे ओढल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. गायकवाड यांच्या वक्तव्यामुळे केवळ बुलढाणा नव्हे, तर राज्यातील इतर नगरपालिकांमधील मतदार याद्यांच्या पारदर्शकतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
महाविकास आघाडी आक्रमक....
मंत्रालयात मंगळवारी झालेल्या बैठकीत मतदार यादींचा घोळ ते व्हीव्हीपॅटच्या मुद्यावर ठाकरे बंधूंनी मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांना धारेवर धरलं होतं. त्यानंतर बुधवारी पुन्हा बैठकीचे आयोजन करण्यात आले. राज्याचे निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे हे देखील बैठकीत उपस्थित होते. ठाकरे बंधूंसह महाविकास आघाडीचे नेत्यांनी प्रश्नांची सरबत्ती केली. दुबार मतदारांसह काही संशयित मतदारांचा मुद्दाही अधोरेखित केला.