नेमकं काय घडलं?
EKYC आणि ओटीपीशिवाय आता एलपीजी सिलिंडर दिलं जाणार नाही. त्यामुळे हे करणं बंधनकारक करण्यात आलं आहे, मात्र त्यातही अनेक अडचणी येत असल्याने लोकांचा संताप होत आहे. सध्या गॅस सबसिडी आणि इतर तांत्रिक कामांसाठी ई-केवायसी करणं अनिवार्य आहे. यासाठी गॅस एजन्सीवर नागरिकांची लांब रांग लागली आहे.
जुने विडी घरकुल परिसरातील साई राम गॅस एजन्सीवरही अशीच गर्दी होती. सोमनाथ धनुरे हा देखील तिथे EKYC साठी आला होता. मात्र, अनेकवेळा सर्व्हर डाऊनची कारण देण्यात आली, वेळेची मर्यादा संपणे अशी कारणं देऊन एजन्सीकडून ग्राहकांना घरी पाठवलं जात होतं. याच कारणावरून सोमनाथचा एजन्सी चालकांशी वाद झाला आणि त्याने रागाच्या भरात दगड उचलून एजन्सीच्या दिशेने भिरकावला.
advertisement
महिला ग्राहक जखमी, परिसरात तणाव
सोमनाथने मारलेला दगड दुर्दैवाने तिथेच रांगेत उभ्या असलेल्या एका महिला ग्राहकाला लागला. यामुळे ती महिला जखमी झाली असून तिला तातडीने उपचारासाठी हलवण्यात आले आहे. या घटनेनंतर परिसरात एकच गोंधळ उडाला आणि काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. नागरिकांनी या प्रकाराबद्दल संताप व्यक्त केला असला तरी, दगडफेक केल्यामुळे आरोपीवर टीकेची झोड उठत आहे.
पोलीस कारवाई आणि नागरिकांचा संताप
या घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दगडफेक करणाऱ्या सोमनाथ धनुरे याच्यावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, या निमित्ताने गॅस एजन्सीबाहेर होणारी गर्दी आणि वारंवार डाऊन होणारे सर्व्हर यामुळे सर्वसामान्य नागरिक किती वैतागले आहेत, हे पुन्हा एकदा समोर आलं आहे. "एजन्सीवाले नीट उत्तरं देत नाहीत आणि सर्व्हर चालत नाही, मग आम्ही करायचं काय?" असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.
