निवडणूक आयोगानं मतमोजणी प्रक्रिया अधिक पारदर्शक, शिस्तबद्ध आणि गतीमान करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय. यापूर्वी ईव्हीएम (Electronic Voting Machine) मतमोजणी पोस्टल बॅलेटची मतमोजणी पूर्ण होण्याआधी सुरू होऊ शकत होती. मात्र, आता आयोगानं स्पष्ट केलंय की पोस्टल बॅलेटची मतमोजणी पूर्ण होईपर्यंत शेवटच्या दुसऱ्या फेरीची ईव्हीएम मतमोजणी सुरू करता येणार नाही. यामुळे कोणत्याही प्रकारचा संभ्रम, वाद किंवा तक्रारी टाळता येणार आहेत. अनेकदा पोस्टल मतदान मोजणीच्या मुद्यावरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैऱ्या झडल्या आहेत.
advertisement
गेल्या काही निवडणुकांमध्ये पोस्टल बॅलेट मतांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढताना दिसून आली आहे. दिव्यांग मतदार आणि ८५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी घरबसल्या मतदानाची सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत पोस्टल मतांची अचूक आणि वेगवान मोजणी सुनिश्चित करण्यासाठी आयोगानं नव्या सूचना जारी केल्या आहेत.
आयोगानं मतमोजणी केंद्रांवर अधिक टेबल्स आणि कर्मचारी उपलब्ध करून देण्याचे आदेश दिलेत. त्यामुळे पोस्टल मतपत्रिकांची मोजणी वेळेत आणि काटेकोरपणे पूर्ण होणार आहे. या निर्णयामुळे मतमोजणीच्या प्रक्रियेत गती येणार असून, अंतिम निकाल जाहीर करण्यात होणारा विलंब टाळता येईल.
निवडणूक आयोगानं केलेला हा बदल पारदर्शकता आणि जनतेचा विश्वास वाढवण्यासाठी एक महत्त्वाचं पाऊल ठरणार आहे. मतमोजणी प्रक्रियेत स्पष्टता आणि शिस्त राहिल्यामुळे राजकीय पक्ष, उमेदवार आणि मतदार यांच्यात विश्वासाचे वातावरण निर्माण होणार आहे. आयोगाच्या या पावलामुळे मतमोजणीशी संबंधित वाद-विवाद कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
एकूणच, पोस्टल बॅलेट आणि ईव्हीएम मतमोजणीची नवी व्यवस्था निवडणूक प्रक्रियेतील प्रामाणिकपणा आणि विश्वासार्हता अधिक दृढ करणारी ठरणार आहे. सोबतच केंद्रीय निवडणूक आयोगाच्या संदर्भात गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या विरोधी वातावरणामध्ये निर्णय घेण्यात आला आहे. लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या विरोधात अनेकदा खुलासे केले आहे त्यामुळे शेवटी आता केंद्रीय निवडणूक आयोगाने हे निर्णय घेतले आहे.