प्रज्वल पांडे (२७) आणि मोहित बांते (२९) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या दोन्ही आरोपींनी फेसबुकवरून ओळख करून २२ वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचार केला आहे. ही धक्कादायक घटना भंडारा शहरात घडली. याप्रकरणी भंडारा पोलिसांनी तत्काळ कारवाई करत दोन्ही आरोपींना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी आणि आरोपी प्रज्वल पांडे यांची ओळख फेसबुकवरून झाली होती. प्रज्वलने तिला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून तिच्याशी मैत्री केली. त्यानंतर त्याने तिला लग्नाचे आमिष दाखवून अनेकदा भेट घेतली आणि तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. तरुणीने त्याला शारीरिक संबंध ठेवण्यास स्पष्ट नकार दिला होता.
advertisement
पण २० सप्टेंबरच्या रात्री प्रज्वलने तरुणीला घरी सोडण्याच्या बहाण्याने आपल्या दुचाकीवर बसवून कॅनल रोडवर नेले. तिथे त्याने तिला गुंगी येणारे पेय पिण्यास दिले. तरुणी बेशुद्ध झाल्यानंतर प्रज्वलने तिच्यावर अत्याचार केला. त्याचवेळी त्याचा मित्र मोहित बांते तिथे आला आणि त्यानेही तरुणीसोबत शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला. तरुणीने विरोध केला असता, दोन्ही आरोपींनी तिला जीवे मारण्याची धमकी दिली.
या घटनेनंतर पीडित तरुणीने तत्काळ भंडारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी या तक्रारीची गंभीर दखल घेत भारतीय दंड संहिता तसेच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार निवारण अधिनियम अंतर्गत गुन्हा नोंदवला. पोलिसांनी तातडीने तपास करत दोन्ही आरोपींना अटक केली आहे. या घटनेमुळे शहरात संतापाचे वातावरण असून, आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास भंडारा पोलीस करत आहेत.