गोंदिया: सध्या जीएसटीमध्ये दर कपात झाल्यामुळे वाहनांच्या किंमती कमी झाल्या असून वाहन खरेदीसाठी लोकांची गर्दी केली आहे. त्यातच ईलेक्ट्रिक वाहनं खरेदीसाठी लोक जास्त पसंती देत आहे. पण, अशातच गोंदियामध्ये ईलेक्ट्रिक रिक्षा चार्जिंग लावताना एक धक्कादायक घटना घडली आहे. ई-रिक्षा चार्जिंग लावताना विजेचा धक्का लागून पिता-पुत्राचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, गोंदियाच्या तिरोडा शहरातील संत रविदास वॉर्डात ही घटना घडली आहे. ई-रिक्षा चार्जिंगला लावत असताना विद्युत करंट लागून पिता-पुत्रांच्या मृत्यू झाल्याची घटना गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा येथील संत रविदास वार्ड येथे घडली. नरेश बरियेकर (५५) व दुर्गेश नरेश बरियेकर (२२) असं मृत पिता-पुत्राचं नाव आहे.
संत रविदास वॉर्डातील नरेश बरियेकर यांनी काही दिवसांपूर्वी ईलेक्ट्रिक रिक्षा खरेदी केली होती. नेहमी प्रमाणे नरेश बरियेकर यांनी ई-रिक्षा आपल्या घराजवळ पत्र्याच्या शेडमध्ये उभे केली होती. रिक्षा चार्जिंगला लावत असताना अचानक टिनाच्या शेडला विद्युत ताराचा स्पर्श झाला. त्यामुळे शेडमधून विद्युत प्रवाह शटरमध्ये आला. यावेळी नरेश बरियेकर यांनी शटरला स्पर्श करताच त्यांना विजेचा शॉक बसला.
वडिलांना विजेचा धक्का बसल्याचं पाहून त्यांचा मुलगा दुर्गेश याने त्यांना वाचवण्यासाठी धाव घेतली. पण त्यालाही विजेचा धक्का लागला. यामध्ये दोघांचाही जागीच मृत्यू झाला. बराच वेळ झाला दोघांचा काही आवाज न आल्यामुळे घरच्यांनी जावून पाहिलं असतं दोघांचेही मृतदेह आढळून आले. तातडीने विजेचा प्रवाह बंद करण्यात आला. या घटनेमुळे बरियेकर कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे.
स्थानिकांनी तातडीने घटनेची माहिती तिरोडा पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला आणि मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास तिरोडा पोलिस करीत आहेत.