मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण पश्चिम परिसरात असलेल्या पटेल डी मार्टमध्ये ही घटना घडली आहे. सोमवारी सकाळी ज्येष्ठ माहिती कार्यकर्ते श्रीनिवास घाणेकर टिळक चौकातील पटेल आर मार्ट दुकानात वस्तू खरेदीसाठी गेले होते.
तिथं वस्तू खरेदी करताना घाणेकर यांनी मार्टमधील ग्राहक सेवेतील तरुणीला खरेदीच्या वस्तू देण्याची मागणी केली. तरूणीने हिंदीतून बोलणं सुरू केलं. घाणेकर यांनी तुम्हाला मराठी येत नाही का? असा प्रश्न केला. तरुणीने घाणेकर कोण याचा परिचय नसल्यानं त्यांना मराठी बोलण्याची सक्ती आहे का? नाही आली तर काय फरक
advertisement
पडतो?, अशी उलट उत्तरं दिली. ही उत्तरे तरूणीने रागाच्या भरात हात आदळआपट करत दिली.
घाणेकर यांनी तातडीने पटेल आर मार्ट दुकानाच्या व्यवस्थापनाला ही माहिती दिली. 'आपण महाराष्ट्रात कधी आहात, असा प्रश्न घाणेकर यांनी विक्रेत्या तरूणीला केला. तिने आपण चार वर्ष महाराष्ट्रात राहत आहोत', असं उत्तर दिलं. दुकानाच्या व्यवस्थापक मनीषा धस यांना घाणेकर यांनी घडला प्रकार सांगितला. व्यवस्थापक धस यांनी दुकानातील प्रत्येक कर्मचाऱ्याला मराठी भाषा येईल यादृष्टीने प्रयत्न केले जातील. कामगारांना तशा सूचना केल्या जातील, असं आश्वासन घाणेकर दिलं.
यावेळी महिनाभरात या दुकानातील प्रत्येक कर्मचारी मराठी बोलला पाहिजे, अन्यथा या दुकानात खरेदी करू नका, असं आवाहन आपण नागरिकांना करणार आहोत, असा इशारा घाणेकर यांनी व्यापारी संकुल दुकान व्यवस्थापनाला दिला आहे. त्यामुळे कल्याणमध्ये पुन्हा मराठी आणि परप्रांतीय यांच्या बोली भाषेवरून वाद रंगला आहे.