रायगडच्या नागावमध्ये मंगळवारी बिबट्यानं 6 जणांवर हल्ला केला. तर बुधवारी सकाळी नागपूरच्या पारडीत बिबट्यानं हल्ला करत, तब्बल 7 जणांना जखमी केलं. बिबट्यांच्या या मानवी वस्त्यांवरील हल्ल्याचे पडसाद अधिवेशनातही उमटले. आमदारांनी बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांचा मुद्दा उपस्थित करत सरकारवर प्रश्नांची सरबत्ती केली.. पारडीतील हल्ल्यावरुन भाजप आमदारानंच वनविभागाच्या कारभारावर सवाल उपस्थित केले.
पुणे जिल्हा बिबट्यांची पंढरी
advertisement
राज्यातील जवळपास सगळ्याच भागांमध्ये बिबट्यांचा मुक्त संचार सुरू आहे. बीडच्या आष्टी तालुक्यातील किन्ही रस्त्यावर शेतात जाताना शेतकऱ्यांना बिबट्याचं दर्शन घडल्यानं दहशत पसरलीय. तिकडे पुणे जिल्हा तर बिबट्यांची पंढरीच बनलाय. पण, बिबट्यांच्या मुक्तसंचारानं शिरूर तालुक्यातील एकट्या पिंपरखेड परिसरात तिघांचा मृत्यू झाला. तर जुन्नरच्या वडगाव आनंदरमध्ये एक मादी आणि तिचे दोन बछडे वनविभागाच्या पिंजऱ्यातील कोंबड्यांवर हल्ले करताना कॅमेऱ्यात कैद झाले. महिनाभरात या परिसरातून तब्बल 22 बिबटे जेरबंद केले गेले.बिबट्यांच्या याच मुक्त संचार आणि हल्ल्यांच्या निषेधार्थ जुन्नरचे आमदार शरद सोनवणे थेट बिबट्याच्या वेशातच विधानभवनाच्या आवारात अवतरले.
बकऱ्या आणि शेळ्या सोडण्याचं अजब फर्मान
बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यानं शेतकरी, सामान्य नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. अशावेळी या गंभीर प्रश्नांवर गांभीर्यानं विचार होणं गरजेचं आहे. पण, जेव्हा हा प्रश्न वनमंत्र्यांना विचारला गेला, तेव्हा त्यांना बिबट्यांच्या बंदोबस्त करण्यासाठी थेट बकऱ्या आणि शेळ्या सोडण्याचं अजब फर्मान सोडलंय.
शेळ्या- बकऱ्यांचा अपव्यय ठरणार?
खरंतर बिबट्यांची वाढती संख्या, त्यांचा मानवी वस्तीतील वावर आणि वाढले हल्ले याचं अभ्यासपूर्ण विश्लेषण करून, त्यावर पर्याय शोधले पाहिजे.. पण, वनमंत्र्यांचं फर्मान पाहता, तसं होताना दिसत नाही.. त्यामुळं आम्ही बिबट्यांचा गंभीर प्रश्नावर तज्ज्ञांची मतं जाणून घेतली. बिबट्यांच्या वाढती संख्येमुळं वारंवार मानव आणि बिबट्यांच्या संघर्ष होतोय. हा संघर्ष रोखण्यासाठी ठोस उपाययोजना होणं गरजेचं आहे. पण, वनमंत्री मात्र बिबट्यांना शेळ्या-बकऱ्यांचा पुरवठा करण्याचा विचार करतायेत. अशानं खरंच बिबट्यांचा गंभीर प्रश्न मार्गी लागणार आहे का? की हा फक्त पैशांचा आणि शेळ्या- बकऱ्यांचा अपव्यय ठरणार? असे अनेक सवाल यातून उपस्थित होतोय
